लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्ट्रीय ज्ञान आयोगाने शिवाजी विद्यापीठाचे विकेंद्रीकरण करावे अशी शिफारस केली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे हे नियोजित उपकेंद्र इस्लामपूर शहरात व्हावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी केली आहे.
जाधव म्हणाले, वाळवा तालुक्याला सामाजिक, राजकीय, क्रांतिकारी, सहकार, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा अशी मोठी परंपरा आहे. थोर विचारवंतांचा, क्रांतिकारकांचा वारसा असलेला वाळवा तालुका प्रसिद्ध आहे. याच तालुक्यात आचार्य जावडेकर, शीघ्रकवी शाहीर पठ्ठे बापूराव, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ज्येष्ठ साहित्यिक कवियत्री सरोजिनी बाबर, वसंत सबनीस, इंग्रजांना सळो की पळाे करणारे क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, इंदुताई पाटणकर, राजकीय पटलावरील राजारामबापू पाटील, माजी खासदार एस्. डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कुस्ती क्षेत्रातील पहिले महाराष्ट्र केसरी भगवान मोरे, डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी महाराष्ट्राच्या तख्तावर अधिराज्य गाजवले आहे. कबड्डी, व्हॉलिबॉल, हॉकी या खेळांतील शेकडो राष्ट्रीय आणि कबड्डीमधील तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू इस्लामपूर शहराने दिले आहेत. कुस्तीमधील नजरुद्दीन नायकवडी आणि कबड्डीतील पोपट पाटील, नितीन मदने, संजय वडार हे छत्रपती पुरस्कार विजेते या मातीने दिले आहेत.
जाधव म्हणाले, वाळवा तालुक्याची सहकार पंढरी म्हणून महाराष्ट्रात ख्याती आहे. या तालुक्यात चार सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, औद्योगिक उद्योगकेंद्रे सुस्थितीत चालू आहेत. इस्लामपूर शहराला शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखले जाते. शहरात अभियांत्रिकी, वैद्यकीय, स्पर्धा परीक्षेची अत्याधुनिक अकादमी आहे. शहरालगतच राष्ट्रीय महामार्ग जोडला गेलेला आहे. शहरालगत महाराष्ट्र शासनाची ९८ एकर पडीक जमीन होणाऱ्या उपकेंद्रासाठी उपलब्ध हाेऊ शकते. संपूर्ण तालुका ओलीताखाली आला आहे.
इस्लामपुरात विविध कलागुणांना वाव आहे.धार्मिक परंपरेत हिंदू-मुस्लिम समाजांच्या सलोख्याचे शहर म्हणून त्याची ओळख आहे. तसेच हे शहर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता शिवाजी विद्यापीठाचे नियोजित उपकेंद्र इस्लामपूर (वाळवा) येथे उभारण्यात यावे. त्यासाठी लवकरच पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार आहोत.