अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जादा असूनही विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यापुढे त्यांची डाळ शिजत नाही आणि राष्ट्रवादीने उसने घेतलेले उपनगराध्यक्ष दादा पाटील यांची गाडी वरचेवर ट्रॅकवरून घसरत आहे. त्यातच गटनेते संजय कोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक नेतृत्वहीन झाले आहेत.
मध्यंतरी उपनगराध्यक्ष पाटील यांनी राजीनामा दिला म्हणून चर्चा सुरू झाली होती. आता पुन्हा या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे पाटील यांची गाडी ट्रॅकवरून घसरू लागली आहे. गटनेते कोरे यांनी यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही निवड न झाल्याने तेच सध्या गटनेते असल्याचे राष्ट्रवादीतून सांगितले जात आहे. असे असले तरी, कोरे मात्र पालिकेतील कोणतीही जबाबदारी स्वीकारताना दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक नेत्याविना पोरके झाले आहेत.
सध्या शहरात भुयारी गटार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे काम वगळता इतर विकासकामे ठप्प आहेत. तोंडावर पावसाळा आला असताना, शहरातील रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे असताना भुयारी गटारीसाठी रस्ते खोदले जात आहेत. याचा वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार नसल्याचे दिसत आहे. याविरोधात राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक बोलताना दिसत नाही. त्यातच दादा पाटील यांच्या राजीनाम्याच्या अफवेमुळे विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये उकळ्या फुटत आहेत.
विकास आघाडीचे नेते मात्र न केलेल्या विकासाचा डांगोरा पिटण्यातच धन्यता मानत आहेत. नियोजित विकास आराखडा शासनदरबारी प्रलंबित असल्याने गुंठेवारीतील प्रश्न प्रलंबित पडले आहेत. पुण्याला बदली झालेले नगररचनाकार आठवड्यातून एकवेळ इस्लामपूरला येतात. परंतु त्यांचा वेळ येण्याजाण्यातच जातो. गुंठेवारीच्या फायली धूळ खात पडून आहेत.
उपनगराध्यक्ष दादा पाटील यांच्याबद्दल विरोधक अफवा पसरवत आहेत. शहरात घाणीचे साम्राज्य आहे. सत्ताधाºयांचा प्रशासनावर कसलाही वचक नाही. नगराध्यक्ष दालनात नगरसेवक वगळता बगलबच्चांचाच वावर वाढला आहे. तेच आता प्रशासनातील अधिकाºयांना धारेवर धरताना दिसत आहेत.- शहाजी पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी