अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यापासून इस्लामपूर नगरपालिकेतील विरोधी राष्ट्रवादी जागी झाली आहे; तर सत्ताधारी विकास आघाडी विकासाचे दिवास्वप्न दाखवत आहे. आता पालिकेची निवडणूक तोंडावर येताच दोन्ही गटांकडून शहरातील विकासाच्या घोषणा केल्या जात आहेत; परंतु प्रत्यक्षात विकासाचा ठणठणाट आहे.
आधी भुयारी गटारीच्या कामाला सुरुवात करू, त्यानंतर रस्ते होणार, असे सत्ताधारी एकीकडे सांगत आहेत. दुसऱ्याबाजूला पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची पूर्ण सत्ता आल्यास शहरातील रस्ते करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील देत आहेत. रस्त्यांची कामे श्रेयवादात अडकली आहेत. याचा त्रास शहरवासीयांना सोसावा लागत आहे.
गेल्या साडेचार वर्षांत विरोधी राष्ट्रवादीचे गटनेते फक्त पदावर बसलेले होते. त्यामुळे सत्ताधारी विकास आघाडी सोयीप्रमाणे कारभार हाकत होती. भुयारी गटार योजनेला परवानगी मिळवणे, हीच सत्ताधारी गटाची जमेची बाजू होती. ती वगळता विकासाला गती देताना राष्ट्रवादीने अडथळे आणल्याचा आरोप आघाडीकडून केला जात होता. सत्ताधाऱ्यांत गटबाजी आहे. त्यामुळे गटनेते विक्रम पाटील आणि सत्तेत असभागी शिवसेनेनेच हा निधी उपलब्ध केल्याचे सांगितले जाते.
एक-दोन उपनगरांतील रस्ते वगळता उर्वरित शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मुख्य चौकांत अधिक गंभीर चित्र आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी प्रभागनिहाय बैठका घेऊन रस्त्यांबाबत आश्वासने दिली. त्याला सहा महिने होऊन गेले, तरी रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यांचे पुत्र प्रतीक पाटील ‘शासन आले आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत लोकांशी संपर्क साधत आहेत; तर जयंत पाटील यांनी इस्लामपूर-बहे आणि इस्लामपूर-वाघवाडी या दोन रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिला, मात्र अंतर्गत रस्त्यांना हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यामुळेच रस्त्यांचा विकास फक्त घोषणा आणि श्रेयवादात अडकणार आहे
चौकट
दोन्ही गटांकडून रस्त्याचे भूमिपूजन
सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या गटनेत्यांनी आपापल्या प्रभागात रस्ते चकाचक केले आहेत. परंतु, त्या लगतच्या प्रभागात रस्त्यांचा पत्ता नाही. विक्रम पाटील यांनी काही रस्त्यांचा प्रारंभ केला; त्याच रस्त्यांचे भूमिपूजन राष्ट्रवादी करताना दिसत आहे.