अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर, आष्टा, शिराळ्यासह ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांच्या आरतीला आमंत्रित करावे, यासाठी राजकीय नेत्यांनीच आता ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. काही मंडळांचे पदाधिकारी सर्वच पक्षांच्या नेत्यांना बोलावतात; तर काही नेत्यांचे समर्थक मात्र आपल्याच नेत्याला आरतीला बोलावण्यासाठी आग्रह करत आहेत. त्यामुळे आरतीवरून मंडळांमध्येही राजकारण पेटले आहे.
आमदार जयंत पाटील मंत्रिपदावर असताना इस्लामपुरातील मंडळांच्या आरतीचे कार्यक्रम आटोपण्यासाठी मध्यरात्रीपर्यंतही उपस्थित राहत असत. ग्रामीण भागातही त्यांना निमंत्रणे स्वीकारताना तारेवरची कसरत करावी लागत असे. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघातील आरतींना उपस्थित राहण्यासाठी त्यांचे पुत्र प्रतीक आणि राजवर्धन यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. आता तर सत्ता नसतानाही आमदार पाटील यांच्यासह दोन्ही पुत्रांना मोठ्या प्रमाणावर निमंत्रित केले जात आहे. आमदार पाटील यांचा मात्र सायंकाळी ६ ते १० या वेळेत आरतीला उपस्थिती लावण्यासाठी अधिक प्रयत्न असतो.
सध्या भाजपच्या सत्तेमुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, त्यांचे पुत्र सागर खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनाही मोठ्या प्रमाणावर निमंत्रित केले जात आहे. इस्लामपूर परिसरात राहुल महाडिक आणि शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक यांचीही आरतीसाठी लक्षणीय उपस्थिती दिसत आहे.
निवडणुकांचे वेध लागल्याने खासदार राजू शेट्टी, जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक व राजवर्धन, सदाभाऊ खोत व त्यांचे पुत्र सागर खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नानासाहेब महाडिक, त्यांचे पुत्र राहुल आणि सम्राट महाडिक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे संस्थापक, पदाधिकाऱ्यांना आरतीसाठी आमंत्रित केले जात आहे. गणेश मंडळांकडून नेत्यांना बोलाविल्यामुळे आरतीचा भाव वाढला आहे.नेता आणि ओवाळणीजयंत पाटील मंत्रिपदावर असताना, आरती झाल्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याच्या खिशात जी रक्कम मिळेल, ती ओवाळणीच्या ताटात ठेवत असत. त्यांनी खिशात हात घातला, म्हणून कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरत नसे. आता यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हजारोच्या पटीत ओवाळणी देऊ लागले आहेत. आमदार जयंत पाटील यांनीही मंडळ पाहून ओवाळणीच्या रकमेत वाढ केली आहे.