इस्लामपूर : इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवारी मिळण्यासाठी अनेक इच्छुक सरसावले आहेत. सोमवार, दि. १ रोजी भाजप, शिवसेना, हुतात्मा, महाडिक गटासह कवठेपिरानचे भीमराव माने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चाही केल्याचे समजते.
आगामी विधानसभेसाठी आमदार पाटील यांच्याविरोधातील सर्वजण एकत्र येण्यासाठी सरसावले आहेत. परंतु अद्यापही त्यांच्यात एकमत नाही. येथील उमेदवारी कोणत्या पक्षाला जाणार, हेही अद्याप ठरलेले नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, पालिकेचे पक्षप्रतोद व ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष भाजपचे विक्रम पाटील, महाडिक गटाचे राहुल महाडिक, हुतात्मा संकुलातील गौरव नायकवडी यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवरच ही भेट झाल्याचे समजते.
याबाबत विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही सदिच्छा भेट होती. इस्लामपूर शहरातील विकास कामाला लागणाऱ्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली. उमेदवारीबाबत काहीही बोलणे झाले नाही.
याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पवार यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून करावयाच्या विकास कामांसाठी लागणाºया निधीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटलो असल्याचे सांगत, हा मतदारसंघ शिवसेनेलाच असल्याने आम्ही तयारीत आहोत, असेही स्पष्ट केले. राहुल महाडिक यांनी, आपणही इस्लामपूर मतदार संघातून इच्छुक असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतल्याचा खुलासाही त्यांनी केला.सदिच्छा भेट की राजकीय चर्चा?इस्लामपूर येथील राष्ट्रवादीविरोधातील सर्व विरोधक एकत्रितरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. त्यांच्याकडून ही भेट सदिच्छेची असल्याचे सांगितले जात असले तरी, याला राजकीय किनार आहेच. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हे सर्व भेटीसाठी गेल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. आगामी काळात राष्ट्रवादीचे बरेच मोहरे भाजपच्या गळाला लागणार असल्याचे विक्रम पाटील यांनी स्पष्ट केले.