इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर येथे केलेले विधान त्यांना इस्लामपूरच्या नगराध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरुन केलेले आहे. जर तुम्ही इस्लामपूर शहराच्या विकासासाठी १०७ कोटींचा निधी आणला असेल, तर त्यातून आपण कोणती विकास कामे केली? याचा हिशेब नगराध्यक्षांनी इस्लामपूरच्या जनतेला द्यावा, असे आवाहन इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजी पाटील यांनी केले.याचवेळी त्यांनी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील जनतेला गुलाम म्हणून वाळवा तालुक्यातील जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी तालुक्यातील जनतेची जाहीर माफी मागायला पाहिजे, अशी मागणीही केली.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आम्ही वाळवा तालुक्यातील जनतेची गुलामगिरीतून सुटका केल्याचे विधान केले आहे. या विधानांवर पाटील द्वयींनी जोरदार आक्षेप घेतला. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान राजकीय, तर सदाभाऊ खोत यांचे विधान दुदैवी आहे.राज्याचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहर व वाळवा तालुक्याला आपले कुटुंब समजून हे शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे.
हे या शहरातील व तालुक्यातील जनता चांगलेच जाणते. त्यांनी आणलेल्या निधीतून पाणी पुरवठ्याची योजना, ४-५ लहान मोठे बगीचे, २ नाट्यगृहे, रस्ते, गटारी तसेच २ प्रशासकीय इमारती, न्यायालय, पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अशी किती तरी विकासकामे या शहरात उभा राहिलेली दिसतात. मात्र त्यांनी ही कामे करताना कधी डांगोरा पिटला नाही.
काहीवेळा गानकोकिळा लता मंगेशकर, तत्कालीन खासदार पी. अलेक्झांडर तसेच अनेक आमदार, खासदारांकडून निधी उपलब्ध केला आहे. आपण आणलेल्या १०७ कोटींच्या निधीतून कोणती विकास कामे केली? या निधीचे काय केले? हे जनतेला सांगावे लागेल.