कळंबी (ता. मिरज) येथे विलगीकरणात राहिलेल्या कोरोनाबाधितांनी अजितराव घोरपडे विद्यालयाचा परिसर चकाचक केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालगाव : कळंबी (ता. मिरज) येथे कोरोनाबाधित रुग्णांनी दहा-बारा दिवस विलगीकरणात राहताना वेळेचा सदुपयोग केला. शाळेच्या संपूर्ण परिसराची साफसफाई करताना प्रांगण चकाचक केले.
कळंबीमध्ये ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती व शाळा व्यवस्थापनाने अजितराव घोरपडे विद्यालयात संस्थात्मक विलगीकरणाची सोय केली आहे. कळंबी व परिसरातील सौम्य लक्षणे असलेले रुग्ण या विद्यालयात राहतात. त्यांच्यासाठी सर्व त्या सोयी-सुविधा गावकऱ्यांनी केल्या आहेत. प्रत्येक रुग्ण सरासरी दहा दिवस याठिकाणी राहतो. या काळात रुग्णांनी एकजुटीने शाळेच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली.
आयएसओ प्रमाणपत्र मिळवलेल्या शाळेचे प्रांगण नितांत सुंदर आहे. पण गर्द झाडीमुळे पालापाचोळा साचून राहतो. शिवाय सव्वा वर्षांपासून शाळा बंद असल्यानेही अस्वच्छता निर्माण होऊ लागली होती. रुग्णांनी त्याच्या साफसफाईची मोहीम राबवली. प्रांगण, मैदान, स्वच्छतागृहे यांची साफसफाई केली. झाडांची निगा राखताना विलगीकरणाचा कालावधी सत्कारणी लावला. दक्षता समितीने त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.