सांगली : सांगलीवाडी ते लिंगायत स्मशानभूमीलगतच्या नव्या रस्ता व प्रस्तावित पुलाच्या भूसंपादनाचा प्रश्न महिन्याभरात मार्गी लावू, असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी सांगितले.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील सांगलीवाडी ते लिंगायत स्मशानभूमीपर्यंतचा ८० फुटी रस्ता, नवीन पूल, सरकारी घाट ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत पूरसंरक्षक भिंत याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सूर्यवंशी म्हणाले की, लिंगायत स्मशानभूमीलगत नवीन पूल प्रस्तावित आहे. या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच या रस्त्याच्या भूसंपादनाचे काम महिन्याभरातही मार्गी लावू. या रस्त्यावर चार ते पाच ठिकाणी अतिक्रमण आहे. तेही काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
सरकारी घाट ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत नदीपात्रालगत पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात पाच कोटी निधीतून या कामाला सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनाबाबत कार्यवाही करण्याचे सूचना जलसंपदा विभागाला केली आहे.
या बैठकीला उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक मैनुद्दीन बागवान, युवराज बावडेकर, विष्णू माने, माजी नगरसेवक शेखर माने, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे उपस्थित होते.