अतुल भोसले, इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची केवळ घोषणा बाकी आहे. वैयक्तिक पातळीवर आतापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी तर नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.
रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी गेल्या दीड वर्षापासून सोशल मीडियावरून प्रचार सुुरू केला आहे. त्यांच्या प्रचारात खासगीकरण, खुले सभासदत्व, ऊस तोडणी समस्या आदी विषय वारंवार येत आहेत. आता त्यांनी कारखान्याच्या नामकरणाचा मुद्दा मांडला आहे. कारखान्याचे नाव ‘कृष्णा’ होते. त्यानंतर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना झाले. आता जयवंत शुगरही होईल, तर संस्थापक पॅनेल पुन्हा आले तर अविनाश-प्रशांत प्रा. लि., असेही नाव होईल, असा सूचक इशारा डॉ. मोहिते यांनी सभासदांना दिला आहे.
संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांनी कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा जाहीर केला आहे. विविध कर्जाचा तपशील सभासदांपुढे मांडला आहे. सहकार पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी गाठी-भेटीवर भर दिला आहे. डॉ. अतुल भोसले यांनी रयत आणि संस्थापक पॅनेलवर तोफ डागत विरोधकांनी कारकिर्दीत काय दिवे लावले, असा सवाल उपस्थित केला आहे. डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांना सत्ता कशासाठी हवी, याचे विश्लेषण सभासदांपुढे मांडावे, असे आव्हान दिले आहे.
या नेत्यांनी वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.