विश्वजित यांच्या प्रचारात विकासकामांचेच मुद्दे --:टीका-टिपणीला बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:02 AM2019-10-15T00:02:54+5:302019-10-15T00:06:34+5:30
‘मी डॉ. पतंगराव कदम नाही, परंतु त्यांच्यासारखा प्रयत्न जरूर करेन. त्यांनी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून कामे केली. त्यामुळे नागरिकांना ते नेहमी आपल्या हक्काचे माणूस वाटायचे. मीही त्यांच्यासारखेच काम करेन. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना एकटे सोडणार नाही’, असा विश्वास
अशुतोष कस्तुरे ।
पलूस : कोणत्याही प्रकारची टीका-टिप्पणी न करता फक्त विकासाचे आणि आपण केलेल्या कामाचे मुद्दे घेऊन आमदार विश्वजित कदम यांचा प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे. ‘मी डॉ. पतंगराव कदम नाही, परंतु त्यांच्यासारखा प्रयत्न जरूर करेन. त्यांनी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून कामे केली. त्यामुळे नागरिकांना ते नेहमी आपल्या हक्काचे माणूस वाटायचे. मीही त्यांच्यासारखेच काम करेन. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना एकटे सोडणार नाही’, असा विश्वास आ. विश्वजित कदम प्रचार करताना देत आहेत.
आमदार डॉ. कदम यांनी पलूस तालुक्यातील बहुतेक सर्व गावे पिंजून काढली आहेत. त्यांच्यासोबत डॉ. शिवाजीराव कदम, आमदार मोहनराव कदम, शांताराम कदम, डॉ. जितेश कदम, महेंद्र लाड यांच्यासह सर्व कदम कुटुंबीयांनी कंबर कसली आहे.
डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या कामाची माहिती आणि या मतदार संघाला कदम यांनी दिलेली उभारी, येथील उद्योग, व्यवसाय, एमआयडीसी आणताना केलेले प्रयत्न आणि त्याच्या यशस्वीतेनंतर झालेली प्रगती, विविध पाणी योजनांच्या माध्यमातून येथील शेतीत आलेली हरितक्रांती, सोनहिरा कारखाना, भारती विद्यापीठ, रुग्णालय यांच्या माध्यमातून सामान्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासाठीची तत्परता या सर्व गोष्टी प्रचाराचे मुद्दे ठरले आहेत.
कोणत्याही पक्षावर टीका-टिपणी करणे त्याला बगल देत आपण केलेल्या कामांचा प्रचार विश्वजित कदम आणि कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.प्रत्येक बुथनिहाय, वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन, प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे. कोणीही गाफील राहू नये, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याकडून वैयक्तिक माहिती घेतली जात आहे, असे महेंद्र लाड यांनी सांगितले.
येथील जनतेने डॉ. पतंगराव कदम यांना जसा नेहमी भरभरून आशीर्वाद दिला होता, तसाच ते मलाही देतील आणि ऐतिहासिक मताधिक्याने यावेळी मला निवडून आणतील.
- विश्वजित कदम
कसलीही काळजी करू नका.. मी नेहमी तुमच्यासोबत असेन, अशा शब्दात आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी प्रचारादरम्यान आजीबार्इंना आश्वस्त केले.