विटा : दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काँग्रेसला उभारी देण्याचे काम केले. पक्षानेही अनेक जणांना मोठी पदे दिली आहेत. परंतु, पक्षासह सर्वसामान्यांसाठी झटणारे पतंगराव कदममुख्यमंत्री झाले नाहीत, ही खंत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या प्रभारी खासदार रजनीताई यांनी व्यक्त केले.बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या १० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ मंगळवारी खा. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आ. मोहनराव कदम, संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम, अध्यक्ष डॉ. राहुल कदम, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी विभागप्रमुख कमलाकर पाटील, माजी कुलगुरू डी. पी. साबळे, पूर्ण वेळ संचालक उत्तम पाटील उपस्थित होते.खासदार पाटील म्हणाल्या, की दुष्काळी भागातील उदगिरी शुगर कारखाना अत्यंत चांगल्याप्रकारे सुरू आहे. भविष्यात तंत्रज्ञान आणि विज्ञानाची गाठ घालून कारखाने चालवावे लागतील.डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, की दुष्काळी खानापूर तालुक्यासह परिसराचा विकास व्हावा या उद्देशाने उदगिरी कारखान्याची उभारणी केली आहे. एफआरपी हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. त्यामुळे एफआरपीचा एक पैसाही बुडविला नाही. हमीभावापेक्षा आतापर्यंत ६८ कोटी रुपये जादा दिले आहेत.अध्यक्ष डॉ. राहुल कदम म्हणाले की, पाणी व ऊस नसलेल्या भागात उदगिरी कारखान्याची उभारणी करून सुरुवातीला टँकरने पाणी आणून तीन हंगाम पूर्ण केले. आता तोच कारखाना प्रगतिपथावर असून खासगी साखर कारखान्यांच्या यादीत उदगिरी अव्वलस्थानी आहे.या कार्यक्रमास सुभाष पाटील, दादामहाराज नगरकर, गोविंद रूपनर, मालन मोहिते, रवींद्र देशमुख, नंदकुमार पाटील, रामरावदादा पाटील, जयहिंद साळुंखे, के. डी. जाधव उपस्थित होते.
'पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले नाहीत, ही मोठी खंत'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 4:55 PM