हणमंत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: निवडणूक रोख्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भाजपला उघडे पाडणारा आहे. पंतप्रधानांचे कार्यालय वसुलीचे कार्यालय बनले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. मिरजेत रविवारी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी विशाल पाटील यांच्यासह माजी मंत्री अजितराव घोरपडे, जयश्रीताई पाटील, किशोर जामदार, सुरेश आवटी, निरंजन आवटी, मैनुद्दीन बागवान, मनोज सरगर आदी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, निवडणूक रोखे घ्यावेत म्हणून ईडी, सीबीआय, पोलिसांमार्फत तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या. मोदी देशाला कंगाल केल्याशिवाय राहणार नाहीत. अर्थमंत्र्यांचे पतीच म्हणतात की, मोदी स्वतःला हुकूमशाह म्हणून जाहीर करतील. घटना मोडीत काढतील. निवडणुका संपवतील. पुढील पाच वर्षांत देशाचा नकाशा बदलतील.अजितराव घोरपडे म्हणाले, ४०० पार झाल्यास संविधान बदलले जाईल. भाजपने सोयीस्कर उमेदवार घेतले. त्यामुळे जिल्ह्याचे शेतीचे प्रश्न तसेच राहिले. रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) नेते राजेंद्र गवई म्हणाले, ४०० पार ही घोषणा संविधान बदलण्यासाठी आहे. त्याविरूद्ध संघटित झाले पाहिजे.
यावेळी जयश्रीताई पाटील यांनी 'अफवांवर विश्वास ठेवू नका, आमचे घर एक झाले आहे,' असे सांगितले. वंचितचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, इंद्रजित घाटे हेदेखील उपस्थित होते.
वंचितच्या पाठिंब्याअभावी पराभव
विशाल पाटील म्हणाले, २०१९ मध्ये वंचितच्या पाठिंब्याअभावी पराभूत झालो. आज वसंतदादांचे विचार धोक्यात आहेत. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. अहंकारी खासदार बेताल वक्तव्ये करीत आहेत, त्यांचा अहंकार जनता संपवेन.