सांगली : मिरजेच्या क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही तो गंभीर असल्याचे सांगण्यात आल्याने गोंधळ झाला. नातेवाइकांनी याबाबत प्रशासनाकडे रीतसर तक्रार दिली.
मिरजेतील एका कोविड रुग्णाला १६ जुलैला क्रीडा संकुलातील सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी रुग्णाच्या नातेवाइकांना प्रकृती स्थिर असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. रविवारी दुपारी तीन वाजता रुग्णाचा एक नातेवाईक सेंटरवर चौकशीसाठी गेला, त्यावेळी एका कर्मचाऱ्याने रुग्ण चिंताजनक असल्याचे सांगितले. याबाबत नातेवाइकाने आश्चर्य व्यक्त केले. अचानक प्रकृती कशी बिघडली म्हणून त्याने पुन्हा एकदा खातरजमा करण्याची कर्मचाऱ्यास विनंती केली. तो आत जाऊन आल्यानंतर त्याने रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. नातेवाइकांना धक्का बसला. त्यांनी केसपेपरवरील नोंदी दाखविण्याचा आग्रह धरला. त्यावर मृत्यूबाबतची नोंद अडीच वाजताची असल्याचे समजले.
रुग्णाचा मृत्यू झाला असताना तो गंभीर असल्याचे का सांगितले, असा जाब नातेवाइकाने विचारला, तसेच रुग्णाची प्रकृती गंभीर बनल्यानंतर त्याची माहिती नातेवाइकांना का दिली नाही, अशी विचारणाही केली. नातेवाईक प्रत्यक्ष केंद्रावर आल्यानंतरच त्याला माहिती देणे व तीसुद्धा चुकीची देणे धक्कादायक असल्याचे नातेवाइकांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत त्यांनी संबंधितांवर कारवाईसाठी तक्रार केली आहे. त्यांनी संवादाचे चित्रीकरण व कॉल रेकॉर्ड यांचे पुरावे संकलित केले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत रीतसर तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.