शिराळा : महाराष्ट्रातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये प्रत्येक महिन्याचा धान्यकोटा महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ग्राहकांना देणे स्वस्त धान्य दुकानदारांना बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर रॉकेलदेखील ग्राहक येईल त्यादिवशी देणे बंधनकारक राहील. यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई होणार असल्याचे, राज्यपालांच्या आदेशाचे परिपत्रक अवर सचिव प्रदीप गिरिधर चव्हाण यांनी जारी केले आहे, अशी माहिती आमदार शिवाजीराव नाईक यांनी पत्रकारांना दूरध्वनीवरून दिली.
आ. नाईक म्हणाले की, २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागण्यांच्या वेळेस चर्चा सुरू असताना, रास्त धान्य दुकानाबाबत ग्राहकांना येत असणाऱ्या अडचणी आम्ही सभागृहासमोर मांडल्या होत्या. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये स्वस्त धान्य दुकानदार मनमानी कारभार करतात. नागरिकांना धान्य वेळेत न देता दुकानदार त्यांनी ठरविलेल्या वेळेनुसार महिन्यातील काही दिवसच धान्य देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना धान्य आणि रॉकेल मिळत नसे. अशा प्रकारामुळे शिल्लक राहिलेल्या धान्याचा गैरवापर या स्वस्त धान्य दुकानदार मंडळींनी केल्याचे बºयाच ठिकाणी निदर्शनास येत होते.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन स्वस्त धान्य दुकानदारांनी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत धान्याचा पुरवठा, तसेच काही ग्राहकांनी धान्य नेले नसेल तर शिल्लक धान्याचा तपशील तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना द्यावा, अशी मागणी सभागृहात केली होती. ही मागणी मान्य झाली असून यासंदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाने परिपत्रक काढले आहे. स्वस्त धान्य दुकानाचे लाभधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन आणण्याकरिता गेल्यास, त्यांना धान्य दुकानदाराने धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
असे न केल्यास त्या दुकानदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशा आशयाच्या सूचना महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांना परिपत्रक जारी करून देण्यात आल्या आहेत. हे परिपत्रक राज्यपालांच्या आदेशाचे आहे. त्यामुळे यापुढे स्वस्त धान्य दुकानांमध्ये होणारा काळाबाजार थांबण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, गरजू नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबांना स्वस्त धान्य उपलब्ध होणार आहे, असे आ. नाईक म्हणाले.