सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी, तेथील भीषण पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत गिरीश महाजनांवरही नाव न घेता टीका केली. लोकांना त्रास होतोय. हे सांगणं म्हणजे राजकारण नाही, अशा शब्दात फडणवीस यांच्या टीका केली. पूरग्रस्तांना चांगली घरे बांधून द्या, अशी मागणीही पवार यांनी केली.
पुराचे पाणी आज ना उद्या उतरेल, पण त्यानंतर काय? पूरग्रस्तांच्या हाताला आता काम देणं ही सरकारची जबाबदारी आहे. रोजगार हमी किंवा तत्सम योजनांवर लोकांना पाठवून त्यांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी. पूरग्रस्तांवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारने मदत करण्याची गरज आहे. सांगलीतील पाणी कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. तरच सांगलीतील पूरस्थिती आटोक्यात येऊ शकेल.
राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख हे सर्व ठीक चालले आहे, असं समजून चाललेले आहेत. काहीजण तर सेल्फी काढण्यासाठी जात असतील, तर ही स्थिती लवकर ठीक होईल, असं मला वाटत नाही, अशा शब्दात पवार यांनी महाजनांचं नाव न घेता टीका केली. त्यानंतर, मुख्यंमत्र्यांनाही सुनावले. मुख्यमंत्री म्हणत आहेत की, राजकारण करू नका. पण, हे काही राजकारण नाही. इथे लोकांना त्रास होतोय. लोकांना होणारा त्रास सांगणं म्हणजे राजकारण नाही. पूरग्रस्तांना दहा-पंधरा हजार रुपये देण्यापेक्षा त्यांना चांगली घरे बांधून द्यावीत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरनंतर शनिवारी सांगलीतील महापुराचा आढावा घेतला. फडणवीस यांनी हिराबाग येथील रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करून कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती पत्रकारांसमोर मांडली. तसेच, पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे महापूराच्या घटनेचं कुणीही राजकारण करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तर, मला, हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी नसल्यामुळे मी उशिरा आलो. तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन आले होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगतिले. फडणवीस हे नदीच्या पुरानंतर तब्बल पाच दिवसांनी सांगलीत पोहोचले होते.