सांगली : कुपवाड शहरालगत आयटी पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी दहा एकर जागेची आवश्यकता असून महापालिका प्रशासनाने जागेचा शोध सुरू केला आहे.पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आयटी पार्क उभारणीसाठी प्रयत्न चालविले असून काही आयटी कंपन्यांशी वाटाघाटीही केल्या आहेत. पुणे, बंगळुरू, हैद्राबाद अशा मोठ्या शहरांमध्ये आयटी पार्क उभारण्यात आले. यामुळे या शहरांचा झपाट्याने विकास झाला. लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात तरुणांचाही आयटी, संगणक शाखेकडे ओढा वाढला आहे.शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांना मोठमोठ्या शहरात नोकरीचा शोध घ्यावा लागतो. जिल्ह्यात आयटी पार्कसाठी दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी प्रयत्न केले होते. विलिंग्डन महाविद्यालयाच्या मागील जागेत आयटी कंपन्यांसाठी स्ट्रक्चरची सोय केली होती. सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र त्यावेळी कंपन्यांनीच प्रतिसाद न दिल्याने आयटी पार्क बारगळले होते. पण आता जिल्ह्यात आयटी पार्कसाठी पोषक वातावरण आहे.पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नुकतीच काही आयटी कंपन्यांशी चर्चा केली आहे. जिल्ह्यात आयटी पार्कचा विस्तार करण्याची मागणी केली. कंपन्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सांगलीकरांचे आयटी पार्कचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यासाठी सुमारे १० एकर जागेची गरज आहे.
सांगली, मिरजपेक्षा कुपवाड योग्यसांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये जागेचा शोध सुरू आहे. सांगली आणि मिरज शहरांचा विस्तार, महापुराचे सावट पाहता या दोन शहरांमध्ये जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कुपवाड शहरालगत प्रशासनाने जागेचा शोध सुरू केला आहे. आयुक्त सुनील पवार यांनी अधिकाऱ्यांना जागेबाबत सूचना दिल्या आहेत.