प्रवीण जगताप -लिंगनूर -अगदी चार वर्षांपूर्वी गावात गवंड्याच्या हाताखाली काम केलेल्या तसेच शेतात मजुरीचे काम करणाऱ्या एका अल्पशिक्षित शेतमजुराच्या मुलाने गरिबीमुळे हाय न खाता, आपल्या भाऊजींच्या शैक्षणिक मदतीच्या जोरावर गरिबीलाच ठोकर मारत चिकाटीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. अवघा ३०० उंबरा असणाऱ्या मिरजपूर्व भागातील लहानशा जानराववाडी गावातील अजित तातोबा कुंडले या पंचवीशीतील तरुणाने पहिला शासकीय अधिकारी म्हणून मान मिळविला. मंत्रालय सहायक पदावर निवड झालेला अजित सध्या वन खात्याच्या अधिकारी पदाची व विक्रीकर निरीक्षक पदाची पूर्वपरीक्षाही उत्तीर्ण आहे. त्याने स्पर्धा परीक्षेतील आपली वाटचाल कायम ठेवली आहे. दहावीत ६३ टक्के व बारावीत ६५ टक्के गुणांसह जानराववाडी व बेळंकीसारख्या खेड्यात शालेय शिक्षण घेत मध्यम गुणवत्ता मिळविलेल्या या विद्यार्थ्याने बारावीनंतर मात्र अभ्यासात चांगली पकड घेतली. पण बारावीनंतरच्या शिक्षणात त्याला त्याची घरची गरिबी आड येत होती. गरिबीमुळे बी.एस्सी.नंतर एम.एस्सी.च्या शिक्षणाचा खर्च पेलवत नव्हता. सारे मार्ग खुंटले. वडील सातवी पास शेतमजूर. आई शेती आणि घरकाम करणारी सामान्य स्त्री. अशावेळी अजितच्या बहिणीचे पती म्हणजेच त्याचे भाऊजी, आरगेचे रावसाहेब शिंदे त्याच्या मदतीला आले. ते ट्रक मालक आहेत. त्यांनी अजितचा शैक्षणिक खर्च उचलल्यानेच परीक्षेचा अभ्यास व एम.एस्सी.चे शिक्षण त्याला घेता आले. शनिवारी वेबसाईटवर जाहीर झालेल्या निकालात आपली मंत्रालय सहायक पदावर निवड झाल्याचे त्याला कळाले. गावातील पहिला अधिकारी जानराववाडी हे मिरज पूर्व भागातील कर्नाटक सीमेवरील शेवटचे गाव. ३०० कुटुंबे असणाऱ्या अजितच्या गावात अद्याप महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कोणाचीही निवड झालेली नव्हती. लहानशा गावात प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश मिळविल्याने संपूर्ण जानराववाडी गावाला त्याचे कौतुक होत आहे.
गवंडीकाम करुन तो झाला वरिष्ठ अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2015 10:57 PM