सांगली : कडेगाव नगरपंचायतीच्या निकालाकडे पाहिले तर काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मतांमध्ये फारच कमी अंतर राहिले होते. त्यामुळे दोन्ही बाजूने समजूतदारपणा दाखवला गेला असता तर कडेेेगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव करणे शक्य होते, असेे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी सांगलीत केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत मांडले.
पाटील म्हणाले, कडेगावमध्ये भाजपचा विजय रोखता येऊ शकत होता. या निवडणुकीत सर्व पक्षांना मिळालेली मतांचा विचार केलातर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अंतर बघितलेतर हे दिसून येते. नगरपंचायत निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही बाजूंकडून समजूतदारपणा दाखवला असतातर निकाल वेगळा लागला असता. आता यापुढे त्रुटी राहणार नाहीत याची काळजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना घेतील.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी पदाधिकारी व सदस्यांत हाणामारीसह निवासस्थानात नासधूस करण्याचा जो प्रकार झाला तो चुकीचा आहे. याबाबतीत संबंधितांची विचारणा करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीत येणाऱ्यांचे प्रमाण वाढणार
पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात दर गुरुवारी प्रवेश कार्यक्रम होत आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्षात लोक येणाऱ्यांचे प्रमाण आणखी वाढलेले दिसेल. सांगली जिल्ह्यातीलदेखील काहीजण लवकरच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत.