सांगली : शहरातील आयर्विन पुलापासून दहा मीटर अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाने समांतर पुलाची आखणी केली होती. पण आमदार सुधीर गाडगीळ यांनीच पुलाचा मार्ग बदलून तो कापडपेठेतून जाईल, अशी व्यवस्था केल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेवक शेखर माने यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला.
आ. गाडगीळ हे व्यापारी व जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी अहंकार व बालहट्ट सोडून व्यापाऱ्यांशी चर्चा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. याबाबत त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली आहेत. बजाज, माने म्हणाले की, आयर्विनपासून १० मीटर अंतरावर समांतर पूल बांधण्यात येणार होता. तसा आराखडाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला. हा पूल थेट हरभट रोडवर येणार होता. त्यामुळे एकही मालमत्ता बाधित होत नव्हती. पण आ. गाडगीळ यांनी समातंर पुलाबाबत ७ ऑक्टोबर २०१८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठविले आणि पुलाचा मार्ग बदलण्याची सूचना केली. हा नवीन पूल पांजरपोळ, कापड पेठ रस्त्याला जोडण्याची शिफारस त्यांनी केली. तसेच कापड पेठेतील रस्ता १८ मीटर रुंदीने करण्याची हमीही घेतली.
कापड पेठ रस्ता महापालिकेकडे असल्याने तत्कालीन आयुक्तांवर दबाव आणून रस्ता रुंदीकरणाबाबतचे पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. व्यापाऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून गाडगीळ यांना पूल बांधायचा आहे का? असा सवालही त्यांनी केला.
आ. गाडगीळ हे व्यापाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. आयर्विनचा समांतर पूल हा विकास आराखड्यातील आहे, असे ते खोटे सांगत आहेत. विकास आराखड्यात हरिपूर लिंगायत स्मशानभूमीजवळून जाणारा प्रस्तावित पूल आहे. त्यांनी हा पूल विकास आराखड्यातील असल्याचे सिद्ध करून दाखवावे. तसेच कापड पेठेतील रस्ता सध्या ६० फुटाचा अस्तित्वात असल्याचेही दाखवून द्यावे. पुलाचा मार्ग का बदलला? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
चौकट
पुलाचे फायदे सांगावेत : समीर शहा
व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, समांतर पुलाबाबत आ. गाडगीळ यांनी कधी व्यापाऱ्यांशी चर्चा केली हे जाहीर करावे. आम्हीच ४० पानी निवेदन घेऊन त्यांच्याकडे गेलो होते. तेव्हा एकाही व्यापाऱ्याच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले? नाही. मग व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याचे ते कसे म्हणू शकतात? गणपती पेठेतून त्यांनी आपल्या वाहनातून दिवसातून चारवेळा फिरून दाखवावे. कापड पेठ रस्त्याबाबत उच्च न्यायालयात स्थगिती आदेश आहे. तरीही आयुक्तांनी हा रस्ता ६० फुटी करून देतो, असे पत्र कसे दिले? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता? असा सवालही त्यांनी केला. सात वर्षात गाडगीळ यांनी व्यापाऱ्यांचे एक काम केल्याचे दाखवून द्यावे. तसेच पुलाचे फायदेही व्यापाऱ्यांना पटवून द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
चौकट
१३३ व्यापाऱ्यांचे नुकसान
महापालिका चौक ते पांजरपोळ या मेन रोडवर नव्या पुलाच्या रस्ता रुंदीकरणात १३३ व्यापाऱ्यांची दुकाने जाणार आहेत. सध्या हा रस्ता काही ठिकाणी ९ मीटर तर काही ठिकाणी १० ते १२ मीटर आहे. तो १८ मीटर रुंदीने करताना व्यापाऱ्यांची दुकाने हटवावी लागतील. व्यापाऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून हा पूल होणार आहे का? याचे उत्तरही गाडगीळ यांनी द्यावे, असे संजय बजाज म्हणाले.
चौकट
सुधीर गाडगीळ हे राजकारणात कसे आले? ते आमदार कसे झाले, हे सर्वानाच माहित आहे. मी कधीही विशिष्ट हेतू ठेवून काम करत नाही. कापड पेठ रस्ता रुंदीकरणात सराफ कट्टा ते बालाजी चौक हा १८ मीटर रस्ता आहे. त्यामुळे आमच्या दुकानाची पायरीही जात नाही. पण व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही यात उतरलो आहे. ही लढाई शेवटपर्यंत लढणार असल्याचे संजय बजाज यांनी सांगितले.