मिरज : पत्रकारांवर गुन्ह्याच्या मुद्द्यावरून विरोधकांचे राजकारण सुरू आहे. मात्र यापूर्वीच्या सरकारनेच पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचा आरोप आ. गोपीचंद पडळकर यांनी केला.कामानिमित्त मिरजेत आलेल्या आ. पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने राज्य सरकारवर टीकेचे एकमेव काम विरोधक करीत आहेत. पत्रकारांवर गुन्ह्यावरून राजकारण सुरू आहे. मात्र यापूर्वी आघाडी सरकारनेच पत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
टेंभू योजनेचे पाणी मिळण्यासाठी मी केलेल्या आंदोलनाची बातमी कव्हर करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील पत्रकारांवर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनेच गुन्हे दाखल केले होते. अद्याप ते गुन्हे मागे घेतले नसून, हे गुन्हे मागे घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असेही आ. पडळकर यांनी सांगितले.मिरज शहर परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गाेपीचंद पडळकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मिरजेतील रस्त्यावरील अतिक्रमणे काढून लवकरात लवकर रस्ता करण्याची मागणी केली. मिरज या महत्त्वाचा शहराच्या विकासासाठी प्रमुख रस्ता होणे गरजेचे आहे. रस्त्यासाठी निधी मंजूर असल्यामुळे रस्ता करताना कोणीही कसलाही अडथळा आणू नये. नागरिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घ्यावीत. अधिकाऱ्यांनीही अतिक्रमण लवकर काढावे, अशी सूचना आ. पडळकर यांनी यावेळी केली