सांगली : आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही आता अन्य विद्यापीठांप्रमाणे समारंभपूर्वक प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी देशभरात शनिवारी (दि. १७) दीक्षांत सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. आयटीआय अभ्यासक्रमाचे अन्य शिक्षणक्रमांप्रमाणेच महत्व अधोरेखित करण्यासाठी औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे.उद्योग व व्यवसाय क्षेत्राला मनुष्यबळ पुरविणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत आजवर दीक्षांत सोहळा होत नव्हता. अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संस्थेतच विद्यार्थ्याकडे सुपुर्द केले जायचे. अन्य विद्यापीठांमध्ये दिग्गज पाहुण्यांच्या उपस्थितीत पदवीदान तथा दीक्षांत सोहळे होत असले, तरी आयटीआयमध्ये मात्र तसा प्रघात नव्हता. यावर्षीपासून तो सुरु करण्याचा निर्णय संचालनालयाने घेतला. त्यानुसार देशभरातील प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी सोहळा साजरा होत आहे.विशेष गुणवत्ता मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव केला जाईल. त्याशिवाय उद्योजकांचे मार्गदर्शन, रक्तदान शिबिरे, औद्योगिक प्रदर्शने असे कल्पक उपक्रमही ठिकठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून १७ सप्टेंबरचा दिवस निवडण्यात आला आहे.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही आता मिळणार समारंभपूर्वक प्रमाणपत्र, देशभरात उद्या साजरा होणार दीक्षांत सोहळा
By संतोष भिसे | Published: September 16, 2022 2:44 PM