बलवडी (भा.) येथे ग्रामीण साहित्य संमेलन; मनातली घुसमट बाहेर काढण्यासाठी लिहिण्यासारखा सुंदर मार्ग नाहीआळसंद : मनातली घुसमट बाहेर काढण्यासाठी लिहिण्यासारखा सुंदर मार्गच नाही. समाजात लिहिण्यासाठी अनेक प्रश्न आहेत. सद्यपरिस्थितीवर लिहिण्यासाठी मात्र धाडस पाहिजे. कारण आज घडलेली घटना उद्याचा इतिहास असतो. त्यासाठी हातात शस्त्र घेणे सोपे असते, पण लेखणी घेणे अवघड आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी यांनी व्यक्त केले.खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य सांस्कृतिक मंचने आयोजित केलेल्या २८ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून नामदेव माळी बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष धर्मेंद्र पवार, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सरपंच प्रवीण पवार, वासंती मेरू उपस्थित होते.
नामदेव माळी म्हणाले, मोबाईल टॉवरची उंची वाढली, मात्र वाचनालयाची उंची खालावली आहे. त्यामुळे मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी पुस्तकाबाहेरचेही अनुभव मिळावेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच त्यांच्या मनातील प्रदूषण बाहेर जाऊन विचार साफ होतील. लेखन प्रक्रिया ही बंद खोलीत बसून करण्यापेक्षा प्रत्यक्ष घटनांचे आॅन द स्पॉट आकलन करूनच लिहिले पाहिजे.
अभिजित राऊत म्हणाले, ग्रामीण भागातील व्यथा व वेदना मांडण्यासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे अधिक सक्षम आहेत. साहित्य संमेलन हे समाजमनाचा केवळ आरसा नसून, ते प्रीझम आहे. साहित्य संमेलन हे प्रेरणादायी असून, ते साहित्यिक घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे.
यावेळी व्ही. वाय. पाटील, हिम्मत पाटील, सरपंच प्रवीण पवार, बी. डी. कुंभार, संदीप नाझरे, कृष्णत पाटोळे, विस्तार अधिकारी श्रीपाद जोशी, नथुराम पवार, चंद्रकांत देशमुखे, शहाजी चव्हाण, दीपक कुलकर्णी, रघुनाथ पवार, वासंती मेरू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. शांतिनाथ मांगले, हसीना मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. अमीर सय्यद, सयाजीराव जाधव, सुरेश चव्हाण, दीपक सूर्यवंशी यांनी संयोजन केले. प्रा. प्रशांत पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मान्यवरांचा पुरस्कारांनी सन्मानधर्मेंद्र पवार यांनी, ग्रामीण भागात होत असलेल्या साहित्य संमेलनाला शासनाने पाठबळ देणे आवश्यक आहे. ग्रामीण साहित्य संमेलन ही भाषा संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असतात, असे सांगितले. यावेळी ज्योतिर्लिंग साहित्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार दि. बा. पाटील, शाहीर बाळकृष्ण कुलकर्णी-बलवडीकर स्मृती पुरस्कार जोतिराम फडतरे, इंदुमती आनंदराव पवार आदर्श माता पुरस्कार रंजना शहाजी पवार, तर प्रा. एच. के. पवार शेतीनिष्ठ पुरस्कार प्रसाद पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी स्वाती विसपुते, ऋतुराज जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.