देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील विठामाता चव्हाण विद्यार्थी वसतिगृहातील मुलांवर अन्न मागून खाण्याची वेळ आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून इंधनासाठी जळण नसल्याने मुलांना अन्न मिळालेले नाही. जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा आहे. संबंधित कर्मचारी व संस्थाचालक यांच्यात समन्वय नाही. येथील विद्यार्थी स्थानिक मित्रांच्या मदतीने उपजीविका करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे वसतिगृह प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गरीब व अनाथ मुलांना शिक्षण मिळावे, त्यांना राहण्याची उत्तम सोय व्हावी व दोनवेळचे जेवण मिळावे या उद्देशाने मातोश्री विठामाता चव्हाण यांच्या नावाने ७० च्या दशकात देवराष्ट्रे येथे विठामाता चव्हाण विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना केली. सुरुवातीला हे वसतिगृह जागेअभावी यशवंतरावांच्या जन्मघरात सुरू होते. यशवंत एज्युकेशन संस्थेमार्फत हे वसतिगृह चालवले जाते. अनेक गरीब विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र या वसतिगृहाला आज उतरती कळा लागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या वसतिगृहात अन्नाचा कणही शिजलेला नाही. जळण नाही, तांदूळ व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे, असे कर्मचारी सांगत आहेत. दुसरीकडे संस्था संचालकांकडून वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना दोषी धरण्यात येत आहे. या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील स्वयंपाकी आठ दिवसांपासून वसतिगृहाकडे फिरकलेच नाहीत, तर सुरक्षारक्षक सवडीने येत असल्याचे येथील विद्यार्थी सांगत आहेत. (वार्ताहर)दोषींवर कठोर कारवाई करणार : मोहनराव मोरेविठामाता वसतिगृहात जो प्रकार उघडकीस आला आहे, त्यामुळे संस्था बदनाम होत आहे. वारंवार अशा घटना उघडकीस आल्या आहेत. येथील कर्मचाऱ्यांना सुधारण्याच्या अनेक संधी दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीचा अहवाल समाजकल्याण विभागाला सादर करून, कर्मचाऱ्यांचा पगार अनेक महिन्यांपासून रोखला आहे.स तरीही त्यांच्यात सुधारणा दिसून येत नाही. समाजकल्याण अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचे यशवंत एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोहनराव मोरे यांनी सांगितले. यावेळी आनंदराव मोरे, सचिव संजय मोरे, आत्माराम ठोंबरे, मुख्याध्यापक सतीश बनसोडे उपस्थित होते.अस्वच्छतेचे साम्राज्यएकीकडे विद्यार्थ्यांना जेवण मिळत नसताना वसतिगृहाच्या अनेक खोल्यांत, स्वयंपाकघरात, तसेच स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसत आहे.वसतिगृहाला गॅस नाहीकेंद्रासह राज्य शासन वृक्षतोडीला लगाम घालण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. गरीब व इतर कुटुंबांसह शाळा, विद्यालये यांना सरकार सवलतीच्या दराने गॅस देत आहे. मात्र या वसतिगृहाची चूल जळणाशिवाय पेटत नाही.
देवराष्ट्रे वसतिगृहातील मुलांवर अन्न मागून खाण्याची वेळ
By admin | Published: October 06, 2016 11:48 PM