कडेपूर : तडसर (ता. कडेगाव) येथील शब्दरत्न साहित्य सेवा प्रतिष्ठानतर्फे रविवार, दि. १५ जुलै रोजी दुसऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. प्रदीप पाटील यांची निवड केली आहे. संमेलनामध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना ‘तडसर भूषण’ पुरस्कार ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती शब्दरत्न साहित्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नथुराम पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.पवार म्हणाले, या संमेलनाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याहस्ते होणार आहे. तडसर येथील ३० पेक्षा जास्त लोकांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी तडसर भूषण पुरस्कार सुरू करीत आहे. यावर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना जाहीर करीत आहोत. तसेच पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल क्रांती शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांचा विशेष सत्कार करणार आहे.यावेळी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जि.प.च्या सदस्या शांता कनुंजे, कवयित्री मनीषा पाटील, विनायक पवार, अनुपकुमार पवार, प्रवीण पवार, प्रदीप पवार यांचाही सत्कार करणार आहे. शब्दरत्न साहित्य संमेलनाच्या निमित्ताने क्रांतिपर्व पाक्षिकाच्या साहित्य विशेषांकाचे प्रकाशन केले जाणार आहे.
जयसिंगराव पवार यांना ‘तडसर भूषण’ पुरस्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:58 AM