मालगाव : गुंडेवाडी (ता. मिरज) येथील उपसरपंचपदी जालिदंर खांडेकर यांची निवड झाली. त्यांनी सहा विरुद्ध एका मताने विजय मिळविला तर, विरोधकांनी उपसरपंचपदाची बाब न्यायप्रविष्ट असल्याने निवडीवर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली.
गुंडेवाडी ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंचांसह १२ सदस्य आहेत. सत्ताबदलात अनेक सदस्यांनी पक्षाला व गटाला सोडचिठ्ठी देत नवीन जय हनुमान आघाडी स्थापन केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन अपत्यप्रकरणी माजी उपसरपंच धोंडीराम देसाई यांना आपत्र ठरविले आहे. ग्रामसेविकेने रिक्त उपसरपंचपदाच्या निवडणुकीबाबत पत्रव्यवहार केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने पद रिक्त असेल तर निवडणूक प्रक्रिया राबवावी, असा आदेश दिला. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी जालिंदर खांडेकर यांना सहा तर रफीक मुजावर यांना एक मत मिळाले. मतदानावेळी विरोधी सदस्य गैरहजर होते. विठ्ठल एडके, धनंजय सोलंकर, आनंदराव गडदे, संपंतराव पाटील, चंदर कटारे उपस्थित होते.
दरम्यान, विरोधी अपात्र उपसरपंच संतोष देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरुद्ध आयुक्तांकडे दाखल केलेली याचिका न्यायप्रविष्ट असल्याने खांडेकर यांच्या निवडीवर आक्षेप घेत जिल्हाधिकारी, बीडीओ व तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
चौकट
अंधारात ठेवून रिक्त पदाबाबत पत्रव्यवहार
सरपंच
जिल्हाधिकारी कार्यालयाशी रिक्त पदांबाबत पत्रव्यवहार करताना आपणास माहिती देणे आवश्यक होते. मात्र ग्रामसेविकांनी अंधारात ठेवून माझी सही न घेता पत्रव्यवहार केल्याचा आरोप सरपंच भाऊसाहेब पाटील यांनी केला आहे. याबाबत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
स्थगिती नसल्याने निवड प्रक्रिया
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुंडेवाडी उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. अपात्र उपसरपंच धोंडीराम देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला आव्हान दिले असले तरी, या निर्णयाला स्थगिती नसल्याने निवड प्रक्रिया घेण्यात आली. पुढील कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने होईल, अशी माहिती मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांनी दिली.