फोटो १८ जमीर पाथरवट
फोटो १८ संतोष ०४
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेतील आघाडीचा कोरोना योद्धा म्हणून जमीर पाथरवट गेली दीड वर्षे कोरोनाच्या रणांगणावर सशस्त्र लढतो आहे. किमान पाच हजारांहून अधिक इमारतींचे निर्जंतुकीकरण त्याने केले आहे.
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सांगलीत पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर खळबळ उडाली. त्याच्या घरात निर्जंतुकीकरण करायला जाणे म्हणजे प्रत्यक्ष मृ्त्यूशी सामना करण्यासारखी स्थिती होती. बदली कर्मचारी जमीर पाथरवट पुढे सरसावला. अंगभर पीपीई किट घालून धाडसाने सामोरा गेला. घरभर अैाषध फवारणी केली तेव्हापासून त्याच्या कामात खंड पडलेला नाही. दररोज किमान तीन-चार घरांचे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय काम संपत नाही. महापालिकेचा आघाडीचा कोरोना योद्धा म्हणून प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते त्याचा गौरव करण्यात आला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचा प्रतिनिधी म्हणून सत्कारासाठी जमीरला पुढे करत त्याचा सन्मान केला.
एरवी धूरफवारणीचे काम करणाऱ्या जमीरवर कोरोनामध्ये निर्जंतुकीकरणाची जबाबदारी आली. पहिल्या लाटेत कोरोनाची प्रचंड दहशत होती. कोरोनाबाधिताच्या घरापासून तीन-चार किलोमीटरपर्यंत बॅरिकेड्स लाऊन जणू कोरोनाची नाकेबंदी करण्यात आली होती. अशावेळी जमीर घराघरांत गेला. औषध फवारणीवरच थांबता रुग्णांचे समुपदेशनही केले. घरगुती विलगीकरणातील रुग्ण जणू वाळीतच पडतात. अशावेळी त्यांच्या घरात औषध फवारणी करताना धीर देण्याचे कामही जमीरने केले. `घाबरू नका, निश्चित बरे व्हाल` हा त्याने दिलेला धीर अनेकांसाठी लाखमोलाचा ठरला.
चौकट
महापालिकेबाबत विश्वास निर्माण केला
वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे म्हणाले, जमीरसारखे कर्मचारी महापालिकेचा चेहरा ठरले आहेत. कोरोनाच्या अत्यंत जोखमीच्या काळात घरोघरी जाऊन त्याने रुग्णांमध्ये विश्वास निर्माण केला. हा विश्वास महापालिकेच्या सेवेचे प्रतीक ठरला.
चौकट
कोरोना डोक्यात जाऊ दिला नाही
कोरोनाची भीती असली तरी तो डोक्यात जाणार नाही याची खबरदारी घेतल्याचे जमीर सांगतो. घरात पत्नी, आई व तीन मुले अशा परिवाराला कोरोनापासून सुरक्षित ठेवले. स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे थेट कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊनही जमीर संसर्गापासून सुरक्षित राहिला.