पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथे कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर बनली असून, त्या पार्श्वभूमीवर गावात आज, शुक्रवारपासून आठ दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार आहे. आ मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल व पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या तातडीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, बंदोबस्तासाठी गावात एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात येणार आहे.
सध्या सागाव येथील कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार गेली आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गावात शुक्रवारपासून जनता कर्फ्यू पाळून सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले जाणार आहेत. बंदोबस्तासाठी एसआरपीएफचे पाच कर्मचारी गावामध्ये २४ तास तैनात असतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मास्क न वापरणे २०० रु., विनाकारण गावात फिरणाऱ्यांना ५०० रु., दुकाने उघडी ठेवणे अथवा गुप्तपणे व्यवहार करणाऱ्यांना १०० रु. दंड आकारण्यात येणार आहे. कोरोनाबाधित कुटुंबातील व्यक्ती मुक्त वावर करीत असल्यास दंड आकारणी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
बैठकीला सभापती वैशाली माने, सरपंच तात्या पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. निर्मळे, डॉ. पी. एम. चिवटे, ग्रामसेवक एम. आर. पाटील, तलाठी अनिल चव्हाण, विश्वासचे संचालक मानसिंग पाटील, जयसिंग पाटील, सुशांत पाटील, अजित कांबळे उपस्थित होते.