कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांनी सुरू केलेल्या चौथ्या महापौर जनता दरबारात आज, मंगळवारी तब्बल ४१ नागरिकांनी तक्रारी केल्या. दरबारात कौटुंबिक वादाबरोबरच वैयक्तिक स्वरूपाच्या आलेल्या तक्रारींबाबत उत्तरे देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. न्यायालयीन वादवगळता महापालिकेशी संबंधित सर्व तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश महापौरांनी दिले. नागरिकांनी गेल्या चार महिन्यांत तब्बल तीनशेहून अधिक तक्रारींद्वारे गाऱ्हाणी मांडली. महापालिका निवडणूक जवळ आल्याने प्रभागातील तक्रारी घेऊन आलेल्या इच्छुकांनी दरबारात गर्दी केली होती.अधिकारी व प्रशासन कामच करत नाही, अधिकारी भेटत नाहीत, भेटले तरी उद्धट उत्तरे मिळतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. नागरिकांच्या प्रश्नांवर बऱ्याचवेळा अधिकाऱ्यांना निरूत्तर होण्याची वेळ आली. महापालिका प्रशासन नागरिकांच्या सर्वाधिक २२ तक्रारी या बांधकाम विभागाशी संबंधित होत्या. त्यानंतर घरफाळा विभाग (५), आरोग्य (४), परवाना (१), विद्युत (३), उद्यान (२), पाणीपुरवठा (७), नगररचना (५), कामगार विभाग (५), उद्यान व शिक्षण विभागाशी संबंधित प्रत्येकी एक तक्रार दरबारात आली. महापौर दरबारासाठी सर्व विभागांचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी प्रश्न व तक्रार उपस्थित केल्यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यास उत्तर देण्यास पाचारण करण्यात येत होते. सर्व तक्रारींचे येत्या पंधरा दिवसांत निराकरण करण्याचे आदेश महापौरांनी दिले. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, महिला व बालकल्याण सभापती लीला धुमाळ, नगरसेवक राजेश लाटकर, प्रदीप उलपे, वैशाली डकरे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे व अश्विनी वाघमळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)+पायाभूत सुविधा द्याकदमवाडी-पाटोळेवाडीत गौरीनंदन पार्क येथे महापालिकेने गेल्या २० वर्षांत पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. रस्ते, गटारी, सांडपाणी नियोजन, कचऱ्याचा उठाव, आदींपासून येथील परिसर वंचित आहे. या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी महापौर दरबारात केली. याबाबतचे महापालिका आयुक्त बिदरी यांनाही नागरिकांनी निवेदन दिले.
महापौरांच्या जनता दरबारात कौटुंबिक वादांचीही भर
By admin | Published: January 06, 2015 11:37 PM