सांगली : जगात सर्वात महागडा असलेला जपानचा मियाझाकी आंबा आता सांगलीत पिकणार आहे. येथील उद्योजक प्रकाश चव्हाण यांनी शिवाजीनगर येथील फॅक्टरी एरियामध्ये याची लागवड केली आहे. या आंब्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असते.गेल्या काही वर्षात जपानच्या या मियाझाकी आंब्याबाबत कमालीची चर्चा झाली आहे. भारतातही जबलपूर आणि अन्य काही भागात या आंब्याची लागवड करण्यात आली आहे. या आंब्याच्या रक्षणासाठी हंगामात शिकारी कुत्र्यांची फौजच तयार ठेवली जाते. या आंब्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात म्हणजेच हिऱ्याच्या भावात असते. मियाझाकी आंब्याची ही उत्सुकता लक्षात घेऊन चव्हाण यांनी त्याची कलमे मिळवली आहेत. नुकतीच त्याची लागवड केली आहे. हा आंबा चवीला आणि रंगाला फारच चांगला आहे. या आंब्याच्या प्रजातीचा रंग माणिकाप्रमाणे आहे.याशिवाय रेड डायमंड हा जपानी पेरू, लाल फणस, कुपासू, मिरॅकल फ्रुट, ब्लॅकबेरी, आचाई चारू, व्हिएटनाम अर्ली, थाई पिंक अशा हवामानात येणाऱ्या अनेक फळझाडांची लागवडही चव्हाण यांनी केली आहे. १९८४ पासून कुपवाड एमआयडीसी आणि उत्तर शिवाजीनगर येथील त्यांच्या फॅक्टरी एरियामध्ये चव्हाण यांनी अत्यंत दुर्मिळ अशी १३० झाडे लावलेली आहेत. आता त्यात आणखी नव्या झाडांची भर पडली आहे. त्यांना अशी दुर्मिळ झाडे लावण्याचा आणि ती वाढवण्याचा छंद आहे.
आंब्याचे वैशिष्ट्यया आंब्याला जपानीत ताइयो-नो-तमागो म्हणजेच सूर्याचे अंडे म्हणून ओळखले जाते. ही आंब्याची प्रजाती जपानमधील क्यूशू प्रांतातील मियाजाकी शहरात आढळून येते. एका आंब्याचे वजन सुमारे ३५० ग्रॅमपेक्षा अधिक असते. यामध्ये साखरेचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक असते. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान या आंब्याचा मोसम असतो. हे मियाजाकी आंबे जगात सर्वाधिक महागडे आंबे आहेत. गेल्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात २.७० लाख रुपये प्रतिकिलो प्रमाणे याची विक्री झाली आहे.