सांगली : एकरकमी परतफेड योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या व्यतिरिक्त अन्य कर्जांसाठी झिडकारले आहे. दुसरीकडे साखर कारखानदारांना मात्र, हव्या तेवढ्या रकमेचे कर्ज दिले जात आहे. त्यांना वेगळा न्याय का, असा सवाल करीत जत व परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा बँकेसमोर निदर्शने केली.सांगलीतील जिल्हा बँक मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी विक्रम ढोणे म्हणाले की, २० ऑगस्ट रोजी जिल्हा बँकेने एक परिपत्रक काढले. परिपत्रकानुसार ज्या शेतकऱ्याने एकरकमी परतफेड योजनेतून थकीत कर्जाची परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यास केवळ पीक कर्जाचाच पुरवठा केला जाईल. जनावरे खरेदी, घरबांधणी, वाहन खरेदीसह अन्य प्रकारचे दीर्घ व मध्यम मुदतीचे कर्ज त्यांना मिळणार नाही. दुसरीकडे बडे थकबाकीदार असलेल्या साखर कारखानदार व सहकारी संस्थाचालकांना ओटीएसमध्ये लाभ देऊनही पुन्हा कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली जातात. त्यामुळे ही बँक शेतकऱ्यांची आहे की, कारखानदारांची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी नाथा पाटील, धनाजी शिंदे, किरण पाटील आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना झिडकारले...कारखानदारांनाच का सांभाळले?; सांगली जिल्हा बँकेच्या परिपत्रकाविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने
By अविनाश कोळी | Published: September 21, 2023 1:54 PM