जत : जत शहरातील श्री न्यू लक्ष्मी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दुकानाचे मालक राजाराम प्रकाश शिंदे (वय ४०, रा. तिप्पेहळ्ळी, ता. जत) यांनी जत पोलिसात रविवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे. मुख्य बाजारपेठेतील दुकान फोडल्यामुळे शहरातील व्यापारी भयभीत झाले आहेत.राजाराम शिंदे यांचे जतमध्ये मुख्य बाजारपेठेत महाराणा प्रताप चौक ते जयहिंद चौकदरम्यान भाडोत्री गाळ्यात सराफी दुकान आहे. शनिवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. त्यानंतर अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर कटावणीने उचकटले. दुकानातील सुमारे ५०० किलो वजनाची लोखंडी तिजोरी बाहेर आणली.
तिजोरी चारचाकी गाड्यावरून जयहिंद चौकातून स्टेट बँकेसमोरून पुढे नेली. तिथे मोटारीत गाड्यासह तिजोरी घातली व मोटार शहरातील वाचनालय चौकातील लोखंडी पुलालगत सार्वजनिक शौचालयाच्या आडोशाला नेली. तिथे लोखंडी तिजोरी गॅस कटरने खोलून त्यातील सुमारे २० किलो चांदी व २५० ग्रॅम सोने असा सुमारे १५ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
वीस किलो चांदीमध्ये चांदीचे पैंजण व वाळे, तोडे, तर २५० ग्रॅम सोन्यामध्ये कर्णफुले, नेकलेस, गंठण, बांगड्या यांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून मोटार वाचनालय चौकापर्यंत नेल्याचे निष्पन्न झाले आहे. याच दुकानात आणखी एक मोठी लोखंडी तिजोरी होती. पण चोरट्यांनी तिला हात लावला नाही.ही घटना रविवारी सकाळी दुकानासमोर राहणारे शांतिलाल ओसवाल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती दुकान मालक राजाराम शिंदे यांना दिली. घटनास्थळी श्वानपथक पाचारण केले होते. परंतु श्वान त्याच ठिकाणी घुटमळले. ठसेतज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत. या दुकानाशेजारी जय लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स हे दुकान आहे. या दुकानाचेही शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील पाचशे रुपयांची चिल्लर लंपास केली. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करत आहेत.