भागवत काटकर--शेगाव म्हैसाळ योजनेचे पाणी कवठेमहांकाळच्या शिवारात पोहोचले आहे. जत तालुक्यालाही म्हैसाळ योजनेचे पाणी कधी येणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र जुनी थकबाकी ५० लाख रुपये असून त्यापैकी २५ लाख रुपये भरले, तर जतला पाणी देऊ, असा पवित्रा पाटबंधारे विभागाने घेतला आहे. योजना पूर्ण झालेल्या ठिकाणापर्यंतच हे पाणी येणार आहे. अर्थातच या पाण्याचा उपयोग जत पश्चिम व उत्तर भागातील १८ गावांना होणार आहे. मात्र सध्या या मुख्य कालव्यातील सीडी वर्क (पुलाची कामे) सुरु आहेत. त्यामुळे काही गावांना पाणी जाणार नाही. सध्या तालुक्यात भीषण दुष्काळ पडला असून ६४ टँकरने ४९ गावे व ४१९ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरु आहे. दरम्यान, शेगाव येथील शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील १८ गावांतील तलाव भरल्यास या भागातील दुष्काळाची तीव्रता कमी होणार आहे. जनावरांना चारा व पाण्याची व्यवस्था होणार आहे. डोर्ली, अंकले, कंठी, हिवरे, गुळवंची, धावडवाडी, प्रतापपूर, बिरनाळ, तिप्पेहळ्ळी, कुंभारी, कोसारी, रेवनाळ, शेगाव, वाळेखिंडी, अचकनहळ्ळी, बनाळी व जत या गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. यापैकी काही गावांतील तलावावर ग्रामपंचायतीच्या पाणी योजना अवलंबून आहेत. या पाण्याचा वापर सध्या पिण्यासाठी होत आहे. सध्या जतला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावातून उमराणी, बिळूर, बसर्गी, खोजनवाडी, देवनाळ, मेंढेगिरी या गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ही थकबाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतींनी हातभार लावावा, अशी मागणी होत आहे. शेतकरी व ग्रामपंचायतींच्या योगदानातून थकबाकीतील २५ लाख रुपये जमा करण्याचेही मोठे आव्हान आहे. त्यासाठी १८ गावांतील लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी रेवनाळपासून पुढे जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. शिवाय तिप्पेहळ्ळी तलावात सुद्धा पाणी सरकणे मुश्कील होणार आहे. कारण या दोन्ही ठिकाणी कालव्यातील पुलाची कामे सुरु आहेत. यापैकी जत-कऱ्हाड व जत-शेगाव या ठिकाणची कामे गतीने सुरु आहेत. या सीडी वर्क पुलाच्या कामामुळे पाणी येण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. याचाही विचार लोकप्रतिनिधींनी करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ही कामे पूर्ण होण्यास किमान १ ते दीड महिना लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी आल्यास तिप्पेहळ्ळी, रेवनाळ, शेगाव, अचकनहळ्ळी, बनाळी ही गावे वंचित राहणार आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्यातही सोडण्यात येणार आहे. सांगोल्याचे आ. गणपतराव देशमुख यांनी ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. सांगोला तालुक्याला पाणी हे जत तालुक्याच्या मुख्य कालव्यातून जाते. तालुक्यातील लाभक्षेत्रातील ‘म्हैसाळ’ची थकबाकी ८२ लाख रुपये आहे. ही थकबाकी भरण्याची तयारी आ. देशमुखांनी दर्शविली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनीही या पाण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ५० लाखांसाठी अडवणूक कशासाठी? म्हैसाळ योजनेची जत तालुक्याची थकबाकी केवळ ५० लाख रुपये असताना, शेतकऱ्यांची अडवणूक कशासाठी? २५ लाख भरल्यास पाणी सोडण्याची पाटबंधारे विभागाची हमी तालुक्यातील मुख्य कालव्याची सीडी वर्कची कामे सुरु सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यासही पाणी जत तालुक्यातून जाणार ग्रामपंचायतीच्या पाणी योजना सिंचन तलावावर, त्यांनीही थकबाकी भरावी जत व सांगोल्याच्या लोकप्रतिनिधींनी योजनेसाठी बैठक घेण्याची मागणी
‘जत’ला २५ लाख भरल्यानंतरच पाणी पाटबंधारे
By admin | Published: March 01, 2016 11:28 PM