संख : जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागातील ३१ गावे हॉटस्पॉट बनली आहेत. रुग्णांच्या संख्येने बेड तोकडे पडत आहेत. कोरोना महामारीचे संकटाचा सामना करण्यासाठी राजकीय मतभेद विसरून लढा देण्याची गरज असताना तालुक्यातील राजकीय मंडळी कोविड सेंटर, म्हैसाळ पाणी श्रेयवादाच्या कामात गुंतलेले आहे. श्रेयवादाची खुमासदार चर्चा तालुक्यात रंगली आहे. राजकीय लोकांच्या असंवेदनशीलतेबाबत ग्रामस्थांतून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना उपाययोजना, जनजागृती, प्रतिबंध, लसीकरण,उपचार यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज असताना उणेदुणे काढण्यात, श्रेय घेण्याची केवलवाणी धडपड सुरू आहे. शासकीय ७० बेडचे कोविड सेंटर समाजकल्याण वसतिगृहात उभारले गेले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन कार्यक्रमात श्रेय घेण्याच्या कारणावरून राजकीय पदाधिकारीत वादावादी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. अभिजित चौधरी यांनी हात जोडून शांत राहण्याचा विनंती केली. लोक जगले तरच तुम्हाला राजकारण करता येईल. याचे भान राजकारण्यांना कधी येणार ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
जत पूर्व भागात तालुक्यात ४० वर्षांनी म्हैसाळ योजनेचे बंदिस्त पाईपलाईने उमदीपर्यंत आले आहे. याचा उटगी, लकडेवाडी, सोन्याळ, गारळेवाडी, उमदी, शिंदे कोडगवस्ती येथील शेती, द्राक्ष, डाळिंब फळबागांना फायदा होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिघांत पाण्याचा श्रेयवाद रंगला आहे.
आमदार विक्रम सावंत यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. म्हैसाळ पाण्याचा श्रेय महाविकास आघाडीला दिले आहे. तर राष्ट्रवादीचे माजी शिक्षण सभापती तम्माणगौडा रवीपाटील, बेळोंडगी सोसायटीचे चेअरमन, युवानेते सोमलिंग बोरमणी, युवा नेते संजय तेली यांनी आमदार माजी आमदार विलासराव जगताप, खासदार संजय खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नाने चाळीस वर्षांनंतर पाणी आल्याचा दावा केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. चन्नाप्पा होर्तीकर, तालुकाध्यक्ष माजी जि. प. सदस्य रमेश पाटील यांनी पालकमंत्री जयंतराव पाटील यांना श्रेय दिले.
तालुक्यातील पूर्वभागामध्ये म्हैसाळ योजनेचे पाण्यासाठी पाणी संघर्ष समितीने २०१६ मध्ये उमदी ते सांगली पायी दिंडी काढली होती. तत्कालीन अपक्ष आमदार मधुकर कांबळे यांनी १९९५ साली म्हैसाळ पाण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारला पाठिंबा दिला होता. खासदार संजय पाटील यांनी जत तालुक्यासाठी विस्तारित योजना मंजूर करून आणली. चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकारामबाबा महाराज यांनी संख ते मुंबई मंत्रालय अशी पायी दिंडी काढली होती. पूर्वभागाला म्हैसाळचे पाण्यासाठी मंत्री पतंगराव कदम यांच्याकडे आ.विक्रम सावंत यांनी पाठपुरावा केला होता. माजी जि.प.सदस्य कृष्णदेव गायकवाड याने पाणी मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आहे. या सर्वांच्या संघर्षाची परिणती म्हणून उमदीपर्यंत पाणी आले आहे. ही समाधानाची बाब असताना पाण्याचे श्रेयावरून चढाओढ सुरू झाली आहे. श्रेयाचे राजकारण सुरू आहे. विस्तारित योजनेतून, तुबची बबलेश्वर योजनेतून अन्य गावांना पाणी कसे मिळेल, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.