गजानन पाटील -- संख --दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यासारख्या संकटांना तोंड देत सांभाळलेल्या द्राक्षबागांमधील द्राक्षांच्या काढणीची धांदल जत तालुक्यात सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाची कारणे सांगून बाजारात द्राक्षाचा दर पाडला आहे. सध्या द्राक्षाला व्यापारी २५ ते ३२ रुपये किलो असा दर देत आहेत.महागडी औषधे, खते व मशागतीचा खर्च पाहता हा दर परवडत नसल्याने बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बाजारात विक्री करण्यासाठी उत्पादित केलेल्या द्राक्षांचाही बेदाणा केला जात आहे. त्यामुळे बेदाण्याची शेड हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातच रब्बी हंगामाची सुगी सुरू अससल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंड्या माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. उमदी, बिळूर, तिकोंडी, सिद्धनाथ, संख, जालिहाळ खुर्द, भिवर्गी, जालिहाळ बु।।, दरीकोणूर, डफळापूर, मुचंडी, कोंत्यावबोबलाद, बालगाव, हळ्ळी, करजगी आदी भागात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात ६ हजार ६० हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील, शेततलावातील उपलब्ध पाणीसाठा तसेच टॅँकरद्वारे बागा जगविल्या आहेत. आॅक्टोबरच्या १५ तारखेनंतर व शेवटच्या आठवड्यामध्ये छाटणी घेतली जाते. यावर्षी प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, वाढती औषधे, खते यांच्या वाढत्या किमती, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामुळे द्राक्ष बागायतदाना अनेक संकटातून वाट काढावी लागत आहे. अनेक अडचणींवर मात करीत द्राक्षबागा चांगल्या आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बाजारात थेट विक्री करण्यासाठी उत्पादन घेतले आहे. द्राक्षघड विरळ करण्यासाठी थिनिंग केले आहे. थिनिंगसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. द्राक्षघडातील मण्यांची वाढ चांगली झाली आहे. किमान यंदा तरी द्राक्षांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना फेबु्रवारी, मार्चला अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसाचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांनी दर पाडला आहे. व्यापाऱ्यांनी किलोमागे ७ ते ९ रुपये दर कमी केला आहे. सध्या बाजारात २५ ते ३२ रुपये दर मिळत आहे. हा मिळणारा दर कमी असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सध्या रासायनिक खते, औषधाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. मशागतीचा खर्च वाढला आहे. वीज बिल, मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात द्राक्ष विक्रीसाठी नेणे शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे.पाण्यावरील खर्च वाढलाछाटणी घेतल्यानंतर फळ आणण्यापर्यंत शेतकऱ्यांनी पाण्यावर लाखो रुपये खर्च केले आहेत. परतीचा पाऊस पडेल या आशेवर बागा धरल्या होत्या, पण पाऊसच न झाल्याने टॅँकरने पाणी घातले आहे. कूपनलिका, विहीर खुदाई करून पैसे खर्च केले आहेत. आतापर्यंत सर्वात जास्त पैसा पाण्यावर खर्च झालेला आहे.सर्वत्र कामे सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाईसध्या द्राक्षाची काढणी, पेटी पॅकिंग करणे आदी कामे मजुरांकरवी केली जात आहेत. दोन महिने मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. द्राक्ष काढणीस महिलेला २०० रुपये, पुरुषाला ३०० रुपये मजुरी मिळत आहे. सर्वत्र द्राक्ष काढणीची धांदल, रब्बी हंगामाची काढणी सुरू झाल्याचे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.बेदाण्याला चांगला दर आधुनिक तंत्रज्ञानाची, उत्तम कौशल्याची जोड, कोरड्या हवामानामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. बाजारात चांगला दरही मिळत आहे.
जत तालुक्यात द्राक्षबागायतदारांचा कल बेदाण्याकडे
By admin | Published: March 25, 2016 11:11 PM