लोकमत न्यूज नेटवर्क जत : मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न निकालात काढून त्यावरील अतिक्रमण काढत असताना तेथील चौघांनी तहसीलदार अभिजित पाटील यांना प्रतिकार करून त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्यादरम्यान साळमळगेवाडी (ता. जत) येथे घडली. याप्रकरणी बिरोबा ज्ञानू मासाळ (वय ६०), त्यांची पत्नी वालाबाई बिरोबा मासाळ (५५), मुलगा बाळासाहेब बिरोबा मासाळ (२५), सून नीशा ऊर्फ जनाबाई श्रीकांत मासाळ (३०) या चारजणांविरोधात तहसीलदार अभिजित पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.साळमळगेवाडी-शेखवस्ती-खलाटी असा तीन किलोमीटर कच्चा रस्ता होता. दोन वर्षांपूर्वी बिरोबा मासाळ यांनी हा रस्ता जेसीबी यंत्राने फोडून बंद केला होता व तेथे शेती केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात तहसीलदारांनी निकाल दिला होता. मात्र, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी अपील केले होते. येथील निकालही त्यांच्या विरोधात लागला होता. रस्ता बंद झाल्यामुळे विद्यार्थी, दूध वाहतूक व शेतकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. येथील अरुंद रस्त्यावरून जाताना अपघात होऊन वर्षभरापूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी तहसीलदार अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक आर. ए. ताशीलदार व इतर कर्मचारी मंगळवारी पोलीस बंदोबस्तात जेसीबी घेऊन अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. यावेळी सुमारे तीनशे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी बिरोबा मासाळ यांना समजावून सांगत अतिक्रमण काढून घ्या, अशी सूचना केली. त्यावेळी मासाळ यांनी आपण न्यायालयात अपील केले असून, न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत थांबा, अशी भूमिका घेतली. यावेळी तहसीलदार पाटील म्हणाले की, यापूर्वीचे तीन निकाल तुमच्याविरोधात आहेत. तुम्ही न्यायालयात अपील केले असले तरी, अतिक्रमण काढण्यास स्थगिती नाही. त्यामुळे अतिक्रमण काढावे लागेल. यानंतर बिरोबा मासाळ व इतर तिघे दगड भिरकावू लागल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. यादरम्यान बिरोबा मासाळ यांनी मारलेला दगड तहसीलदार अभिजित पाटील यांच्या डोक्यास लागून ते गंभीर जखमी झाले. उपस्थित मंडल अधिकारी अभयकुमार शेटे, पोलिस निरीक्षक आर. ए. ताशीलदार व इतरांनी त्यांना उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणले. उपचार झाल्यानंतर त्यांनी चारजणांविरोधात फिर्याद दाखल केली.
जतच्या तहसीलदारांवर हल्ला
By admin | Published: June 13, 2017 11:53 PM