जत : म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या लघु वितरिकेतून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी मिळणार आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक प्रचार संपवून पालकमंत्री जयंत पाटील जत तालुक्यात आले होते. त्यांनी येळवी, घोलेश्वर व सनमडी या तीन ठिकाणची बंदिस्त पाईपलाईन आणि लघु वितरिकाच्या कामांना भेट दिली.
म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून जत हे शेवटचे टोक आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील उमदीपर्यंत बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल. त्यामुळे येथील जनतेचा कायमचा वनवास व दुष्काळ संपणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ योजनेतून आलेल्या पाण्यातून भरून घेता येणारे सर्व तलाव भरून घ्यावेत, अशी सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना यावेळी केली.
अंतराळ, वायफळ येथून सुरू होणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनची गळती काढण्याचे काम मंद गतीने सुरू आहे ते तत्काळ पूर्ण करावे. आवंढी, अंतराळ, मोकाशेवाडी, शिंदेवाडी, बागलवाडी, सिंगणहळ्ळी, लोहगांव, बोरगेवाडी, मानेवाडी या गावांना पाणी सोडून दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला आधार द्यावा, अशी विनंती आवंढी ग्रामपंचायत सरपंच आण्णासाहेब कोडग व ग्रामस्थांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना केली.
याची दखल घेऊन म्हैसाळ योजनेचे अभियंता कुमार पाटील यांना पाईपलाईनची गळती काढून वरील गावांतील ओढे, नाले व तलावात पाणी सोडण्याची सूचना केली.
यावेळी राष्ट्रवादीचे जत तालुका अध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, आवंढीचे सरपंच आण्णासाहेब कोडग, कार्यकारी अभियंता कुमार पाटील, सहाय्यक अभियंता चोपडे, उपअभियंता मनोज कर्नाळे, अभिमन्यू मासाळ, बाबा पाटील यावेळी उपस्थित होते.