जत : जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी बूथ कमिट्या स्थापन करून प्रत्येक गावात राष्ट्रवादीची शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी केले.
जत तालुका राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मंत्री जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अल्पावधित मार्गी लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जानेवारीपासून कार्यकर्त्यांनी सक्रिय व क्रियाशील सभासद नोंदणी सुरू करून आगामी निवडणुकीसाठी संच तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत. तालुक्यात महिला राष्ट्रवादीची बाजू कमकुवत आहे. सामाजिक कार्यात पुढाकार घेत असलेल्या महिलांना संघटनेत सामावून घेऊन त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. जत तालुका राष्ट्रवादीच्या कार्यालयात अडीअडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. कार्यालयाची जागा अपुरी असली तरी, सोयीस्कर ठिकाणी आहे. कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी वाव मिळणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी तालुकाध्यक्ष ॲड. बी. ए. धोडमणी, सुरेश शिंदे, ॲड. चन्नाप्पा होर्तीकर, सिद्धाण्णा शिरसाट, आप्पासाहेब पवार, मीनाक्षी आक्की, हेमंत खाडे, जयंत भोसले आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
चौकट
युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी स्वप्निल शिंदे
जत तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नगरसेवक स्वप्निल शिंदे यांची निवड केली. जयंत पाटील यांच्याहस्ते नेमणूक पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.