ंजत : पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मारामारीच्या गुन्ह्यातील तपासात सहकार्य करण्याची हमी देऊन संशयित आरोपीकडे पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलिस फौजदार विजयसिंह नवनाथ घाडगे (वय २५, रा. घाडगे वस्ती, झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. विद्यानगर, जत) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.विजयसिंह घाडगे काही महिन्यांपूर्वी पोलिस दलात रुजू झाला आहे. त्याला प्रशिक्षणार्थी कालावधी सांगली जिल्ह्यात पूर्ण करायचा होता. यासाठी त्याची जत पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली होती. जत तालुक्यातील आवंढी येथील एकजण व त्याच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या संशयित आरोपींच्या गुन्ह्याचा तपास घाडगे याच्याकडे आहे.या तपासात सहकार्य करण्यासाठी व त्यांच्याबाजूने तपास करण्यासाठी घाडगे याने संशयिताकडे पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम न दिल्यास कोणतेही सहकार्य करणार नाही, असे घाडगेने सांगितले. त्यामुळे संशयित तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने तक्रारीची चौकशी केली असता, घाडगेने पंधरा हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला सोमवारी सायंकाळी अटक केली. (वार्ताहर)
जतच्या प्रशिक्षणार्थी फौजदाराला अटक
By admin | Published: March 20, 2017 11:49 PM