लोकमत न्यूज नेटवर्क
संख : आरक्षणाशिवाय सेवाज्येष्ठतेनुसार मागासवर्गीय पदोन्नतीतील सर्व रिक्त पदे भरण्याच्या शासन निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जत प्रांत कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना पदोन्नती देण्याच्या मागणीचे निवेदन प्रांंताधिकारी प्रशांत आवटे यांना देण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निदर्शने सप्ताह जाहीर केला आहे. त्यानुसार आंदोलने करून शासनाचा निषेध केला.
निवेदनात म्हटले आहे की, पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षित पदे तत्काळ बिंदुनामावलीप्रमाणे भरण्यात यावीत. पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद मागासवर्गीय मंत्र्यांना द्यावे. मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाची अंमलबजावणी करावी.
जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, विनोद कांबळे, दुर्गापा ऐवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी जिल्हा परिषद सदस्य राजू खाडे, होलार समाज संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब ऐवळे, दलित महासंघाची विलास देवकुळे, वंचित आघाडीचे प्रशांत झेंडे, रविकांत साबळे, रवींद्र मानवर, बाजी केंगार यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
किशोर चव्हाण, युवक तालुकाध्यक्ष नारायण कामत, राहुल चंदनशिवे, लक्ष्मण कांबळे, प्रशांत ऐदाळे, सुभाष कांबळे, हेमंत चौगुले, संभाजी ऐवळे, रणजीत साबळे, वसंत कांबळे यांनी सहभाग घेतला.