सांगली : ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. यावर्षीही गुरुवारी, २ जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सांगलीतील शासकीय रुग्णालयाजवळच्या डॉ. शिरगावकर रक्तपेढीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे महान पुण्यदान मानले जाते. रक्ताची गरज कोणत्याही व्यक्तीस केव्हाही लागू शकते. रक्त मानवी शरीरात तयार होते आणि त्याची गरज फक्त मानवालाच आहे. माणुसकीच्या नात्याने अडीअडचणीवेळी रक्तदान करणारी व्यक्ती परमेश्वरच मानली जाते. हे महत्त्व लक्षात घेऊनच हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता करताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांनी संपूर्ण जीवनभर लोककल्याण हे मूल्य केंद्रस्थानी ठेवले. त्यांच्या जयंतीनिमित्त याच मूल्यांची जपणूक करण्यासाठी ‘लोकमत’ परिवाराने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात जमा होणाऱ्या रक्तातून अनेकांच्या जीवनात संजीवनी मिळण्यास मदत होणार आहे. श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या कार्याचा वारसा चालविण्याचा हा एक प्रयत्न आहे. यात समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन रक्तदानाचे पुण्य मिळवावे, असे आवाहन ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जवाहरलालजी दर्डा जयंतीदिनी रक्तदान शिबिर
By admin | Published: June 30, 2015 11:16 PM