तासगाव : आसामच्या तेजपूर येथील १८१२ पायनियर युनिटचे जवान गणपती शंकर भोसले यांच्या पार्थिव देहावर रविवार, दि.२९ राेजी डोंगरसोनी (ता. तासगाव) या मूळ गावी सार्वजनिक स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यविधी करण्यात आले.यावेळी तालुक्यातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यकृताच्या आजाराने शनिवारी पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात मृत्यू झाला होता. शनिवारी गणपती भोसले यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. रविवारी सकाळी ११ वाजता भोसले यांचे पार्थिव डोंगरसोनी येथे आणण्यात आले. पार्थिव गावात येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. ग्रामस्थांचाही अश्रूंचा बांध फुटला. सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून पार्थिव ग्रामपंचायतीसमोर आणले. ग्रामस्थांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढून पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले. येथे आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील, ताजुद्दीन तांबोळी, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, मंडल अधिकारी वसंत पाटील, सरपंच राणी झांबरे, उपसरपंच किशोर कोडग, अमित झांबरे, चंद्रकांत मोहिते, राजाराम झांबरे, ग्रामसेवक सुखदेव मोरे, तलाठी संदीप कांबळे यांच्यासह सैन्यातील अधिकारी, जवान यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. सैन्याच्या जवानांनी सलामी दिल्यानंतर पार्थिवावर अंत्यविधी केले.
सांगली जिल्ह्यातील जवान गणपती भोसले अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 5:42 PM