शिखर शिंगणापूर : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात ज्वारीच्या अक्षता व गुलाबी रंगाची उधळण करीत मंगलमय उत्साही वातावरणात शिंगणापूर यात्रेत मंगळवारी शिव-पार्वती विवाह सोहळा साजरा झाला. विवाह सोहळा तसेच धन सोहळ्यासाठी विदर्भ, मराठवाडा, खाणदेशातून लाखो भाविक उपस्थित होते.दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी शंभू महादेव व उमा-पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडतो. यापूर्वी शंभू महादेव मंदीर ते अमृतेश्वरबली मंदिर कळसाला मानाचे पागोटे (ध्वज) बांधण्याचा सोहळा साजरा होतो. यावर्षीही मराठवाड्यातून आलेल्या खामसवाडी (जि. उस्मानाबाद), आपसगाव (जि. बीड), कोळगाव (जि. नगर) येथील मानाच्या ध्वजांचे स्वागत ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर सर्व मानाचे पागोटे वाजतगाजत मंदिरापर्यंत आल्यानंतर देवस्थान समितीमार्फत स्वागत करण्यात आले.सर्व मानाची पागोटी तसेच महादेव कोळी समाजाचे तसेच इतर नवसाची पागोटी एकत्रित करून सर्वांचे एक टोक शंभू महादेव मंदिराच्या कळसाला बांधण्यात आले. त्यानंतर चार टप्प्यांवरून पागोटी अमृतेश्वर मंदिरापर्यंत नेऊन बांधण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव’ गजर करीत जल्लोष केला. ध्वज सोहळा पाहण्यासाठी मराठवाडा, विदर्भातील तीन लाखांवर भाविकांची उपस्थिती होती. ध्वज सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री बारा वाजता शंभू महादेव मंदिराच्या पश्चिमेकडील बोहोल्यावर विष्णू-लक्ष्मीच्या साक्षीने शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडला. विधिवत पद्धतीने पूजा करून मंगलाष्टका म्हणत, ज्वारीच्या अक्षता व गुलाबी रंगाची उधळण करत भक्तिमय वातावरणात विवाह सोहळा साजरा झाला. विवाह सोहळ्यासाठी वधू-वरांकडील मानकरी, समस्त सेवाधारींसह लाखो भाविकांची उपस्थिती होती. ध्वज सोहळा व विवाह सोहळा पार पाडण्यासाठी कोळी समाजासह बडवे, जंगम, घडशी, गुरव या सेवाधारी मंडळींनी परिश्रम घेतले. तर उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे, सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)
विवाहासाठी ज्वारीच्या अक्षता
By admin | Published: April 05, 2017 12:39 AM