अशोक पाटील।इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचे नेतृत्व आमदार जयंत पाटील यांनी सक्षमपणे पार पाडले. यामुळेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आ. पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरची जयंत एक्स्प्रेस महाराष्ट्रात धावणार आहे. ते १६ ते २४ आॅगस्टदरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभेला मात्र त्यांना मतदार संघातच रोखून ठेवण्यासाठी भाजपने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी सांगली महापालिका निवडणुकीत बिघाडी झालेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये पुन्हा आघाडी करण्यात यश मिळवले. परंतु दोन प्रभागात मैत्रीपूर्ण लढतीचा फटका या आघाडीला बसला. आता त्यांचे लक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर आहे. त्यामुळे त्यांनी इस्लामपूर मतदार संघात आपले लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच राज्याची जबाबदारी ओळखून त्यांनी १६ ते २४ आॅगस्ट या आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्राचा धावता आढावा घेण्याचे निश्चित केले आहे.आमदार जयंत पाटील यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आले असले तरी, सध्या त्यांच्या मतदार संघातील राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता पसरली आहे. याउलट परिस्थिती विरोधी भाजप पक्षाची आहे. आगामी विधानसभा आपलीच असल्याच्या अविर्भावात अनेकजण वावरत असून, आपणच उमेदवार असल्याचाही दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
आता तर एकाने जावईशोध लावला असून, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते डॉ. तुषार कणसे हे दिवसा राष्ट्रवादी आणि रात्री वैभव शिंदे यांच्या गटात दिसतात. आता त्यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ते भाजपमध्ये आले तर, मोठी ताकद वाढणार असल्याचा दावाही केला जात आहे. डॉ. कणसे यांची वाटचाल आता शिगावचे नेते स्वरूप पाटील यांच्यासारखी सुरू झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच विधानसभेचे खरे राजकीय स्वरुप स्पष्ट होणार आहे. त्याअगोदरच भाजपचे जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि महाडिक गटाचे राहुल महाडिक यांनी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. सांगली महापालिकेतील यशानंतर आता भाजपचे टार्गेट हे इस्लामपूर विधानसभा मतदार संघ असणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत हे यासाठी मतदार संघात तळ ठोकून असणार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांचीही ताकद मिळणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना आपल्या मतदार संघातच थांबावे लागणार आहे.
आगामी विधानसभेला जयंत पाटील यांच्याविरोधात अनेकजण इच्छुक आहेत. परंतु भाजपने सक्षम उमेदवार शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जो पक्षाला आणि कार्यकर्त्यांना योग्य वाटेल त्यालाच संधी दिली जाणार आहे. त्यामुळे आतापासून कोणी उतावळे होऊ नये. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य निर्णय घेतील. याची पक्ष कार्यकर्त्यांनी वाट पाहावी. त्यांचा निर्णय योग्यच असणार आहे.विक्रम पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपालिका.