अशोक पाटील । इस्लामपूर : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत वाळवा-शिराळा तालुक्यातील जयंत फॅ क्टरचा आलेख ढासळत आहे. भाजप-शिवसेनेने इतर गटांची ताकद घेऊन राष्टवादीविरोधात सुरू केलेली मोर्चेबांधणी यशस्वीतेच्या मार्गावर आहे. हातकणंगले मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना आमदार जयंत पाटील यांची सलगी महागात पडली आहे. याचे श्रेय मात्र रयत क्रांती संघटनेचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतले आहे. शिवसेनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांचे पानिपत केले. वाळवा-शिराळा तालुक्यात आजही जयंत फॅक्टरची ताकद अबाधित आहे. राष्टÑवादीने शेट्टी यांना ३० हजाराहून मताधिक्य दिले आहे. यामध्ये गत निवडणुकीपेक्षा मतांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत आ. पाटील काठावर पास झाले. इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीनंतर राष्टÑवादीविरोधी असलेल्या नेत्यांतील कुरघोड्या शिवसेनेच्या पथ्यावर पडल्या आहेत. राष्टÑवादीतून विकास आघाडीमार्फत भाजपमय झालेले नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या वर्चस्वाला खोत यांनी खो दिला. शेट्टी यांच्याविरोधात खोत यांचे नाव आघाडीवर असताना, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले धैर्यशील माने यांना खासदारीकीची लॉटरी लागली. त्याचे श्रेय घेऊन खोत यांनी आता जयंत पाटील यांनाच टार्गेट करण्याचा डाव आखला आहे.
आगामी विधानसभेसाठी इस्लामपूर मतदारसंघातून आ. जयंत पाटील रिंगणात असतील. त्यांच्याविरोधात भाजपमधून नगराध्यक्ष निशिकांत पाटील, महाडिक गटाचे राहुल महाडिक, हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी, तर हा मतदारसंघ शिवसेनेसाठी आहे, असा दावा करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हेही स्वप्ने बघू लागले आहेत. शिराळा मतदारसंघात राष्टवादीतून मानसिंगराव नाईक यांनी यापूर्वीच उमेदवारी निश्चित केली आहे, तर भाजपमधून आ. शिवाजीराव नाईक यांनीही लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाडिक गटाचे सम्राट महाडिक हेही शिराळा मतदारसंघातून उत्सुक आहेत.