अशोक पाटीलइस्लामपूर : राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचे राजकीय लाँचिंग थंडावले आहे. नव्या राजकीय समीकरणात ‘टप्प्यात आला की कार्यक्रम’ अशी भूमिका जयंत पाटील यांनी घेतल्याचे वृत्त आहे.राज्यात महाआघाडी सरकार असताना मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे पुत्र प्रतीक यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी केली होती. सांगली किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाआघाडीतून लढवण्याचे संकेत होते. राष्ट्रवादीने तयारी सुरू केली होती, परंतु शिवसेना फुटल्यानंतर जयंत पाटील यांनी सावध भूमिका घेतली होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही आमदारांसह भाजपला पाठिंबा दिला अन् राष्ट्रवादीत फूट पडली. जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपदही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या नव्या राजकीय समीकरणात आ. पाटील भाजप किंवा अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार अशी राज्यभर चर्चा रंगली. मात्र, आपण कोठेही जाणार नाही, शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली कार्यरत राहणार, असा खुलासा त्यांनी केला. त्यामुळेच पुन्हा एकदा आ. पाटील यांच्या भूमिकेवर निर्माण झालेला संशयकल्लोळ तूर्त शांत झाला आहे.गेल्या चार दिवसांत जयंत पाटील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले नसल्याबाबत तसेच ते शरद पवार यांच्यासोबतच होते यास अजित पवार यांनीही दुजोरा दिला आहे. जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यातील शरद पवार यांचा दौरा आणि ‘इंडिया’ आघाडी बैठकीच्या नियोजनाबाबत चर्चा केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तरीही पाटील यांच्या भूमिकेवर आजही संभ्रम आहे. परंतु त्यांच्या टप्प्यात आल्यावरच प्रतिस्पर्धी नेत्यांचा कार्यक्रम करणार हे मात्र निश्चित. या सर्व घडामोडींमध्ये प्रतीक पाटील यांचे लॉंचिंग थंडावले आहे.
...तर तिरंगी लढत शक्यआगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून प्रतीक पाटील यांची महाविकास आघाडीतून उमेदवारी निश्चित झाल्यास या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यात तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत.