सांगली : कोणतीही पात्रता नसताना केवळ लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याजागी अनुकंपा तत्वावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आले, अशी खोचक टीका भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीसाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याबाबतची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात यावरुन चर्चेला उधाण आले आहे. यावर पडळकर म्हणाले की, ज्याप्रमाणे शासकीय नोकऱ्यांमध्ये अनुकंपा भरतीचे धोरण राबविले जाते. त्यासाठी गुणवत्तेऐवजी केवळ पात्रता हा निकष असतो. त्याप्रमाणेच जयंत पाटील हे राजारामबापूंच्या जागेवर अनुकंपा तत्वावर राजकारणात आले आहेत.
त्यांनी आजवर जिल्ह्यासाठी एकही ठोस काम केले नाही. आजवर राजकारणात त्यांनी कोणते चांगले काम झाले, ते सांगावे. कोणताही निधी आला की, आपल्या मतदार संघासाठी पळविणे एवढेच काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. अशी व्यक्ती मुख्यमंत्री होईल, असे वाटत नाही. भविष्यात राष्ट्रवादी पक्षच अस्तित्वात राहील की नाही, ही शंका आहे. त्यामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही.
चौकट
त्यांना ‘युनो’मध्ये पाठवा
जयंत पाटलांच्या भावनेची दखल पक्षाचे नेते शरद पवार यांनी घ्यावी आणि त्यांना ‘युनो’मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोठे पाठवता येते का पहावे. कारण जयंत पाटील हे फार बुद्धिमान आहेत, अशी त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, असा टोलाही पडळकर यांनी लगावला आहे.