सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या निष्ठेने जयंतरावांना दिलासा, अजित पवारांची ऑफर धुडकावली

By अविनाश कोळी | Published: July 5, 2023 07:21 PM2023-07-05T19:21:56+5:302023-07-05T19:23:00+5:30

जिल्ह्यातील किती आमदार व पदाधिकारी जयंत पाटील यांच्यासोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Jayant Patil is comforted by the loyalty of MLAs from Sangli district | सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या निष्ठेने जयंतरावांना दिलासा, अजित पवारांची ऑफर धुडकावली

सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या निष्ठेने जयंतरावांना दिलासा, अजित पवारांची ऑफर धुडकावली

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या बैठकीला बुधवारी हजेरी लावली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्ह्यातच पक्ष फोडण्यासाठी अजित पवार गटाने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही. पक्षाचे प्रमुख पदाधिकारीही सोबत असल्यामुळे जयंत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सांगलीतील राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांनी दोनच दिवसांपूर्वी एकत्र येत जयंत पाटील व शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र, दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार, व त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगली जिल्ह्यातील आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ऑफर देत त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बुधवारी मुंबईतील बैठकीला सांगली जिल्ह्यातील किती आमदार व पदाधिकारी जयंत पाटील यांच्यासोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मुंबईतील शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला जयंत पाटील यांच्यासह चारही आमदार उपस्थित होते. यासह जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवा नेते रोहित पाटील, प्रतीक पाटील व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या जिल्ह्यात मोठी पडझड होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत होती, मात्र आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निष्ठा दाखविल्याने जयंत पाटील यांचा बालेकिल्ला अबाधित राहिला.

महापालिका क्षेत्रात फूट पडण्याची भीती

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला फार धोका नसला तरी महापालिका क्षेत्रात फूट पडण्याची शक्यता आहे. याची कल्पना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांना दिली आहे. येत्या आठवडाभरात सांगलीत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन नाराजांची समजूत काढली जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित हाेते. आम्ही एकसंधपणे शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत आहोत. - आ. मानसिंगराव नाईक

Web Title: Jayant Patil is comforted by the loyalty of MLAs from Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.