सांगली : महापालिकेतील भाजपची अडीच वर्षांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील मंगळवारी पालिका मुख्यालयात येत आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावेळी पाटील महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत.
महापालिकेत भाजपचे बहुमत असतानाही महापौर, उपमहापौर निवडीवेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. भाजपचे सात नगरसेवक फोडून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. त्यानंतर जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह असल्याने क्वारंटाईन होते. त्यामुळे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांना त्यांच्यासमवेत विजयाचा आनंद साजरा करता आला नाही. आता ते मंगळवारी महापालिकेत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत साडेअकरा वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त नितीन कापडणीस तसेच नगरसेवक, राष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसंतदादा पाटील सभागृहात ही आढावा बैठक होणार आहे. बैठकीत कुपवाड ड्रेनेज योजना २५० कोटी, सुधारित शेरीनाला प्रकल्प ६० कोटी आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्र ४५.७५ कोटी अशा सुमारे ३५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सादरीकरणही केले जाणार आहे. काळ्या खणीच्या सुशोभिकरणावरही बैठकीत चर्चा होणार आहे. या प्रकल्पांना निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
चौकट
स्वागताची जय्यत तयारी
पालकमंत्री जयंत पाटील महापौर निवडीनंतर प्रथम महापालिकेत येत आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यांच्यासाठी महापालिकेत ‘रेड कार्पेट’ अंथरले जाणार असून, फुलांची उधळणही केली जाणार आहे. प्रशासनानेही महापालिका मुख्यालयाच्या दर्शनी भागाचे रंगकाम हाती घेतले आहे.