जयंत पाटील काँग्रेस की भाजपच्या वाटेवर?, इस्लामपूर शिराळ्यात चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 18:32 IST2024-06-03T18:29:33+5:302024-06-03T18:32:01+5:30
जयंत पाटील यांचा भाजप प्रवेशात अडथळा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

जयंत पाटील काँग्रेस की भाजपच्या वाटेवर?, इस्लामपूर शिराळ्यात चर्चेला उधाण
अशोक पाटील
इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण होताच विविध माध्यमातून निकालाचे ‘एक्झिट पोल’ समाेर येऊ लागताच राष्ट्रवादी काँग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलकाँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. यावर त्यांचे समर्थक मात्र मौन बाळगून आहेत. दुसरीकडे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस सातत्याने त्यांना भाजप प्रवेशासाठी गळ टाकत आहेत. यामुळे जयंत पाटील यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
इस्लामपूर-शिराळा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गेली ३० वर्षे निर्विवादपणे वर्चस्व आहे. सांगली महापालिका, इस्लामपूर-आष्टा नगरपरिषद, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत. हे हेरून मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या त्यांच्या राजकीय भरारीला भाजपने ब्रेक लावला. तेव्हापासून सांगली जिल्ह्यातील त्यांची राजकीय पकड सैल होत चालली आहे.
जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल सुरू केली. पुढील काळात थेट शरद पवार यांची गुरुकिल्ली घेऊन त्यांनी थेट राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला. तेव्हापासूनच राजकारणातील अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत. मंत्रिपदावर असताना राज्याचे राजकारण पाहत आपल्या समर्थकांना राज्यस्तरावरील पदे मिळवून दिली. सहकार क्षेत्रातील त्यांची पकड आजही मजबूत आहे.
राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय यशस्वी ठरले. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत घेतल्यानंतर राज्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीची पडझड होत गेली. तेव्हापासून पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्व करणाऱ्या आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचा निशाणा आहे. भाजपच्या प्रवेशद्वारावर जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा झाली; परंतु शरद पवार यांच्यावरील निष्ठा हे कारण पुढे करीत पाटील यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.
तत्कालीन युती शासन काळात जयंत पाटील भाजपच्या संपर्कात होते. यावेळी अजित पवार यांनी नागपूर येथे त्यांना याबाबत जाब विचारला होता. त्यानंतर अजित पवारच भाजपच्या दारात जाऊन बसले. त्यामुळेच जयंत पाटील यांचा भाजप प्रवेशात अडथळा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पर्याय म्हणून राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला ते पसंती देतील, असेही बोलले जात आहे.
जयंत पाटील काँग्रेसमध्ये येणार असे भाकीत करणारे सुरज चव्हाण कोण राज्याचे नेतृत्व करणारे आमचे नेते निर्णय घेताना अगोदर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतात. आजतरी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर ठाम आहे. - सुश्मिता जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सांगली
अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमच्या गटात येत आहेत म्हटल्यावर तिकडे कुठे जातंय त्यांचे नेते आ. जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील. अशी कोल्हेकुई करत आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला लोकसभेत ६ जागा मिळतील. त्यामुळे आमचे नेते जयंत पाटील कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही. - विजय पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी