सांगली- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या संदर्भात पाटील यांनीही या फक्त अफवा असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा एकदा जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सूचक इशारा सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी दिला आहे. एका कार्याक्रमात बोलताना संजयकाका पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
अजित पवारांनी घेतली सांगलीतील NCP पदाधिकाऱ्यांची बैठक! जयंत पाटलांच्या समर्थकांची उपस्थिती
मिरज येथे एका कार्यक्रमात बोलताना खासदार संजयकाका पाटील यांनी हा सूचक इशारा दिला. संजयकाका पाटील म्हणाले, जयंत पाटील आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटात जात आहेत की, भाजपमध्ये येत आहेत ते आता बघू. निशिकांत पाटील या होकायंत्राने आता आपल्याला इशारा दिला आहे, असं वक्तव्य करत संजयकाका पाटील यांनी हा इशारा दिला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुटल चर्चा सुरू आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांना ईडीची नोटीस आली होती. या नोटीसीनंतर या चर्चा सुरू झाल्या. या संदर्भात स्वत: जयंत पाटील यांनी माध्यमांना मी पक्ष सोडमार नसून या सर्व अफवा असल्याची प्रतिक्रीया दिली होती.
सांगलीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली
काल मुंबईत सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठर अजित पवार यांनी घेतली. या बैठकीत जयंत पाटील यांच्या समर्थकांचाही समावेश होता. अजित पवार यांच्याकडे सांगली, सातारा, पुण्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पवार यांनी सांगलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत सांगलीतील जयंत पाटील यांच्या समर्थकांनाही उपस्थिती लावली होती, यामुळे पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातो. या बैठकीमध्ये सांगलीतील वैभव पाटील यांच्यासह, पद्माकर जगदाळे उपस्थित होते. वैभव पाटील हे विट्याचे माजी नगराध्यक्ष आहेत.
दरम्यान, आज राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या गटाची कोल्हापूर येथे स्वाभीमान सभा होणार आहे. पहिली सभा काही दिवसापूर्वी बीड येथे झाली होती. आता दुसरी सभा कोल्हापूर येथे होत आहे. बीड येथे झालेल्या सभेला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे बोलले जात आहे.